विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
यवतमाळ : रस्ते अपघात किंवा इतर आपत्कालीन प्रसंगी जखमी व्यक्तीला वेळेत मदत मिळाल्यास त्याचा जीव वाचू शकतो. याच संदेशाचा प्रसार करण्यासाठी यवतमाळ जिल्हा पोलीस दलाने "फरक फक्त एका निर्णयाचा..." या घोषवाक्यासह जनजागृती मोहीम सुरू केली आहे.
पोस्टरच्या माध्यमातून नागरिकांना अपघातस्थळी केवळ बघ्याची भूमिका न घेता तात्काळ 112 या आपत्कालीन क्रमांकावर कॉल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एका बाजूला अपघातग्रस्ताकडे मदतीसाठी वाट पाहणारा जखमी आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करणारे लोक, तर दुसऱ्या बाजूला 112 वर कॉल होताच घटनास्थळी तत्काळ पोहोचणारे पोलीस दाखवून योग्य निर्णयाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.
"कोणीतरी मदतीची वाट पाहत असतो... आणि कोणीतरी मदतीसाठी पुढे येतो. तुमचा एक कॉल एखाद्याचे आयुष्य वाचवू शकतो," असा भावनिक संदेश या मोहिमेतून देण्यात आला आहे.
यवतमाळ जिल्हा पोलिसांनी नागरिकांना कोणतीही आपत्कालीन परिस्थिती, रस्ता अपघात, गुन्हा किंवा संकटाच्या वेळी घाबरून न जाता 112 या आपत्कालीन हेल्पलाइनवर त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांच्या एका जबाबदार निर्णयामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो, असा विश्वासही पोलिसांनी व्यक्त केला आहे.

