ठळक बातम्या

    यवतमाळ जिल्ह्यात रेड अलर्ट जारी; पुढील २४ ते ४८ तास अतिवृष्टीची शक्यता, नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन

     

    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    यवतमाळ :  दि. ३० जुलै : भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) यवतमाळ जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून पुढील २४ ते ४८ तासांत विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ (आपत्ती व्यवस्थापन विभाग) यांनी सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

    प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले असून नद्या, नाले व ओढ्यांपासून सुरक्षित अंतर राखण्यास सांगितले आहे. पूल किंवा रस्त्यावर पाणी साचले असल्यास अथवा पाणी वाहत असल्यास ते ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

    तसेच वीजेचे खांब, ट्रान्सफॉर्मर किंवा तुटलेल्या विद्युत तारा यांच्यापासून दूर राहावे, ओल्या हातांनी विद्युत उपकरणांचा वापर टाळावा आणि सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवता केवळ जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत सूचना व इशाऱ्यांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

    शेतकऱ्यांनाही विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वादळी पाऊस व विजांचा कडकडाट सुरू झाल्यास तातडीने सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, काढणी झालेली पिके सुरक्षित स्थळी हलवावीत तसेच पशुधनाला उंच व सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवावे, असे कृषी सल्ल्यात नमूद करण्यात आले आहे.

    जिल्हा प्रशासनाने सर्व नागरिकांनी सतर्क राहून आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

    Photo