वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिक संतप्त; २० जुलैपर्यंत पुरवठा सुरळीत न झाल्यास महावितरण कार्यालयावर मोर्चाचा इशारा
विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : पुनवट व शिंदोला उपकेंद्रांतर्गत सुमारे ४० गावांमध्ये मागील पंधरा दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या गंभीर समस्येबाबत माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी महावितरणच्या शिरपूर येथील सहाय्यक अभियंत्यांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
या निवेदनात पुरड, पुनवट, नायगाव, बेलोरा, कवडशी, सावंगी, चिंचोली, शिंदोला, कळमना, परमडोह, येनाडी, साखरा, कोलगाव, शिवणी, माथोली, जुगादसह सुमारे ४० गावांमध्ये रात्री १० वाजल्यानंतर वीजपुरवठा खंडित होऊन सकाळपर्यंत वीज नसल्याची गंभीर समस्या मांडण्यात आली आहे.
वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, गर्भवती माता, आजारी रुग्ण, विद्यार्थी, शेतकरी व शेतमजूर यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच पाणीपुरवठा योजना, प्राथमिक आरोग्य केंद्रे, पिठाच्या गिरण्या, वेल्डिंग व्यवसाय व इतर लघुउद्योगांवरही याचा विपरीत परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय अनेक ठिकाणी वीजतारा खाली लोंबकळत आहेत, वीजखांब वाकलेले आहेत, ट्रान्सफॉर्मरची सुरक्षा धोक्यात आहे आणि जीर्ण झालेल्या वीज यंत्रणेची तातडीने दुरुस्ती करण्याची आवश्यकता असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले आहे. विभागाकडून "ट्री-कटिंग सुरू आहे" असे कारण देऊन जबाबदारी झटकली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
दि. २० जुलै २०२६ पर्यंत वीजपुरवठा सुरळीत करून आवश्यक दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात यावीत, अन्यथा लोकशाही मार्गाने महावितरणच्या शिरपूर कार्यालयावर न्याय हक्क मागणी मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा विजय पिदुरकर यांनी निवेदनातून दिला आहे. निवेदनाच्या वेळी संजय चिंचोलकर, नंदकिशोर मोहितकर, प्रवीण पिदुरकर,दिनकर बोबडे, लोकेश ठाकरे, विनायक ढवस सरपंच मेंढोली,यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

