विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
यवतमाळ: वणी व पांढरकवडा उपविभागासह विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत शेतातील पाण्याच्या मोटार पंपांच्या केबल व इलेक्ट्रिक खांबावरील ॲल्युमिनियम तारा चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळला मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेत १० चोरीचे गुन्हे उघडकीस आणले असून, एकूण १४ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, रंगनाथ नगर परिसरात संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. सुरुवातीला आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र सखोल चौकशीत त्यांनी वणी, पांढरकवडा, मुकुटबन, राळेगाव, पाटण, पारवा आणि मारेंगाव परिसरातील शेतांमधून मोटार पंपांच्या केबल तसेच इलेक्ट्रिक खांबावरील ॲल्युमिनियम तारा चोरी केल्याची कबुली दिली.
या प्रकरणात शेख अमीर, सैयद अली आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींनी चोरीचा माल वणी येथील एका भंगार व्यावसायिकास विकल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित भंगार व्यावसायिकालाही ताब्यात घेतले. त्याच्या मालवाहू वाहनातून सुमारे १,११० किलो ॲल्युमिनियम तार, चोरीच्या केबलमधील १४ किलो तांब्याची तार, ९ मोटार पंप, चोरीसाठी वापरलेली दोन मालवाहू वाहने आणि तार कापण्याचे कटर असा एकूण १४ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईमुळे वणी, पांढरकवडा, मुकुटबन, राळेगाव, पाटण, पारवा आणि मारेंगाव पोलीस ठाण्यांतील एकूण १० चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ, श्री कुमार चिंता, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री अशोक थोरात व मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर, पोउपनि धनराज हाके पोलीस हवालदार सुनील खंडागळे, सुधीर पांडे, सुधीर पिदुरकर, पोलीस शिपाई रजनीकांत मडावी, सलमान शेख चालक पोलीस हवालदार सतीश फुके सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

