ठळक बातम्या

    केंद्रीय कोळसा मंत्र्यांसमोर प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांची जोरदार मांडणी; नागपुरात विशेष बैठकीची मागणी .

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    नवी दिल्ली : केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री माननीय जी. किशन रेड्डी यांची माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज भैया अहिर आणि आमदार करण देवतळे यांनी नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान कोळसा आणि खाण क्षेत्राशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

    बैठकीत प्रामुख्याने कोल इंडिया आणि वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) अंतर्गत प्रकल्पग्रस्त नागरिक तसेच स्थानिक बेरोजगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा झाली. जमीन संपादनाचा योग्य मोबदला, प्रकल्पग्रस्तांना नोकरी देणे आणि त्यासंदर्भातील विविध अडचणी याकडे केंद्रीय मंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. तसेच, जमीन संपादनाच्या बदल्यात नोकरीसह प्रति एकर ३० लाख रुपये मोबदला देण्याची प्रलंबित मागणीही यावेळी ठामपणे मांडण्यात आली.

    याशिवाय, केपीसीएल (KPCL) आणि अरबिंदो या खाजगी कंपन्यांकडून स्थानिक नागरिकांची होत असलेली कथित पिळवणूक, रखडलेल्या नोकऱ्या, प्रलंबित मोबदला, पुनर्वसन आणि वेतनाशी संबंधित प्रश्नांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.

    बैठकीत केपीसीएल आणि अरबिंदो कंपनीकडून होत असलेल्या कथित अवैध खनन, कराराचे उल्लंघन आणि अधिक उत्पादनातून होणाऱ्या गैरव्यवहारांची 'कोल कंट्रोलर'मार्फत सखोल चौकशी करून संबंधित कंपन्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

    या सर्व प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी नागपूर येथे डब्ल्यूसीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत विशेष बैठक आयोजित करण्याची सूचनाही केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांना करण्यात आली. प्रकल्पग्रस्त, शेतकरी आणि स्थानिक बेरोजगारांच्या न्याय्य मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

    Photo