ठळक बातम्या

    शिक्षणाची वाट आणि मातीची नाळ…! घोडपेठेत हंसराज अहिरांना भेटले कष्टकरी विद्यार्थ्यांचे प्रेरणादायी रूप

     


    विदर्भवार्ता । प्रतिनिधी 

    घोडपेठ : शिक्षण घेत असतानाच आपल्या आई-वडिलांना शेतीच्या कामात हातभार लावणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रेरणादायी भेट माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांना घोडपेठ येथे झाली. शेतातील पीक पाहणीसाठी गेलेल्या अहिरांना हा सुखद आणि मनाला भावणारा अनुभव आला.

    रविवारची सुट्टी असतानाही आराम करण्याऐवजी शेतात आई-वडिलांसोबत कष्ट करणारे सूरज चिकटे (B.E.), पीयूष धरत (पॉलिटेक्निक), वंश असुतकर (ITI) आणि समीर सूर (ITI) हे विद्यार्थी अहिरांच्या नजरेस पडले. शिक्षणाच्या माध्यमातून भविष्य घडविण्याची धडपड आणि त्याचवेळी कुटुंबाच्या शेतीची जबाबदारी सांभाळण्याची त्यांची जिद्द पाहून अहिर प्रभावित झाले.

    अहिर यांनी या विद्यार्थ्यांची आस्थेने भेट घेत त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. त्यांच्या शिक्षणाबरोबरच शेतीच्या कामात घेत असलेल्या सहभागाची माहिती जाणून घेतली. ‘शिक्षण कितीही मोठे स्वप्न दाखवत असले, तरी आपल्या मातीशी आणि कुटुंबाशी असलेली नाळ कायम जपली पाहिजे,’ असा संदेश देत त्यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे आणि आई-वडिलांप्रती असलेल्या बांधिलकीचे कौतुक केले.

    शेतीच्या मातीत राबणारे हात आणि शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहणारे डोळे, असा सुंदर संगम या भेटीत पाहायला मिळाला. ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांची मेहनत, संस्कार आणि जिद्द निश्चितच ‘शिका आणि कुटुंबालाही साथ द्या’ असा प्रेरणादायी संदेश देणारी ठरली.

    अहिर यांनी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक आशीर्वाद दिले. शिक्षणाची उंच भरारी घेत असतानाही मातीशी नाळ जोडून ठेवणारी ही तरुण पिढी आजच्या समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.



    Photo