जिद्द, मेहनत आणि संघर्षाच्या जोरावर Class-I Gazetted अधिकारीपदाची संधी; हंसराज अहीर यांच्या हस्ते सत्कार
विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
मारेगाव : अत्यंत प्रतिकूल आणि हलाखीच्या परिस्थितीवर मात करत मारेगावचा सुपुत्र हेमंत लता शंकर बुजाडे यांनी UPSC CAPF AC Exam 2025 मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे त्यांची Assistant Commandant (Class-I Gazetted) या प्रतिष्ठित अधिकारीपदासाठी निवड झाली असून, त्यांच्या संघर्षमय यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
“परिस्थिती गरीब असली तरी स्वप्नं गरीब नसतात” या उक्तीचा प्रत्यय हेमंत बुजाडे यांच्या यशातून आला आहे. जिद्द, अथक मेहनत, चिकाटी आणि ध्येयाप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हे उल्लेखनीय यश मिळवले.
हेमंत बुजाडे यांच्या या यशाबद्दल माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री मा. हंसराज भैया अहीर यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. तसेच पुढील शासकीय सेवेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पावडे, मारेगाव तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, तालुका सरचिटणीस प्रशांत नांदे, ज्येष्ठ नेते माधव कोहळे, शहर अध्यक्ष अनुप महाकुलकर, नंदू खापणे, पांडुरंग उंबरकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेमंत बुजाडे यांच्या यशामुळे मारेगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, ग्रामीण आणि प्रतिकूल परिस्थितीतून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांसाठी त्यांचे यश निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.
अभिनंदन..... अभिनंदन.... हेमंत




