कामगार अधिकाऱ्यांची कंपनीला तंबी; थकीत वेतन न दिल्यास लेबर कोर्टात जाण्याचा इशारा
विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
गडचिरोली : जिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांचे वस्त्र धुलाईचे काम करणाऱ्या धोबी समाजातील २५ महिला-पुरुष कर्मचाऱ्यांवर मागील दहा महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने आर्थिक संकट ओढवले आहे. महाराष्ट्र शासनाच्या करारानुसार रुग्णालयातील वस्त्र धुलाईचे काम मे. आनंद केमिकल्स, पुणे या कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. या कंपनीने संबंधित कामासाठी धोबी समाजातील २५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
गेल्या दहा महिन्यांपासून हे कर्मचारी नियमितपणे आपले कर्तव्य बजावत असतानाही त्यांना वेतन अथवा मानधन मिळाले नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असून, थकीत वेतन तातडीने मिळावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
याबाबत कर्मचाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक यांच्याकडे आपली कैफियत मांडली. मात्र, अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने श्री. विनायक कावळे, श्री. भक्तदास गडपायले यांच्यासह २५ कर्मचाऱ्यांनी कामगार अधिकारी, गडचिरोली यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली.
तक्रारीची गंभीर दखल घेत १० ऑगस्ट २०२६ रोजी कामगार अधिकारी कार्यालयात जिल्हा रुग्णालयाचे प्रतिनिधी, संबंधित कंपनीचे प्रतिनिधी आणि तक्रारदार कर्मचाऱ्यांची सुनावणी घेण्यात आली. यावेळी कंपनी व रुग्णालयाच्या प्रतिनिधींच्या जबाबातून कर्मचाऱ्यांचे दहा महिन्यांचे वेतन/मानधन थकीत असल्याचे स्पष्ट झाल्याचे सांगण्यात आले.
याप्रकरणी कामगार अधिकाऱ्यांनी कंपनीच्या प्रतिनिधींना थकीत दहा महिन्यांचे वेतन तात्काळ अदा करण्याचे निर्देश दिले असून, वेतन न दिल्यास कंपनीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्ट तंबी दिली आहे.
दरम्यान, विनायक कावळे यांच्या विनंतीवरून महाराष्ट्र राज्य वरठी-परिट-धोबी समाज महासंघ सर्व भाषिकचे ज्येष्ठ मार्गदर्शक तथा प्रदेश उपाध्यक्ष श्री. भैय्याजी रोहणकर यांनी चंद्रपूरहून गडचिरोली येथे येऊन कामगार अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांनी कर्मचाऱ्यांच्या समस्येबाबत सविस्तर चर्चा करून त्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली.
कामगार अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेत, कायद्याच्या चौकटीत राहून संबंधित कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच, पुढील दोन संधींमध्ये कंपनीने थकीत दहा महिन्यांचे वेतन/मानधन अदा केले नाही तर प्रकरण लेबर कोर्टात दाखल करून थकीत वेतनासह पीएफ व व्याजाची रक्कम वसूल करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात येईल, असेही आश्वासन देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
श्री. भैय्याजी रोहणकर यांनी या प्रकरणाची माहिती महाराष्ट्र राज्य वरठी-परिट-धोबी समाज महासंघ सर्व भाषिकचे प्रदेशाध्यक्ष श्री. डी. डी. सोनटक्के यांना दिली. धोबी समाजातील या कर्मचाऱ्यांना न्याय मिळेपर्यंत महासंघ त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील. आवश्यकता भासल्यास संबंधित कंपनीविरुद्ध कायदेशीर कारवाईसोबतच आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही महासंघाच्या वतीने देण्यात आला.
दहा महिन्यांपासून वेतनाच्या प्रतीक्षेत असलेल्या २५ कर्मचाऱ्यांना आता थकीत वेतन कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

