१५ ऑगस्टपर्यंत विद्यार्थिनींना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे निर्देश; निवास, पाणी, स्वच्छता व भोजन व्यवस्थेचा घेतला आढावा
विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी आज आश्रमशाळेला प्रत्यक्ष भेट देत घटनास्थळासह संपूर्ण परिसराची पाहणी केली.
मंत्री उईके यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छता तसेच भोजन व्यवस्थेची सविस्तर पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. आढळलेल्या त्रुटी तातडीने दूर करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
यावेळी मंत्री उईके यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांना धीर दिला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत १५ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घेत त्यांना चांगल्या निवासी सुविधा असलेल्या सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
तसेच वसतिगृह परिसरातील वाढलेले गवत, झुडपे आणि अस्वच्छता नियमितपणे दूर करून परिसर सुरक्षित ठेवण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या. भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.यावेळी आमदार मिलिंदजी नरोटे, माजी खासदार अशोकजी नेते, आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्त आयुषी सिंग, प्रकल्प अधिकारी, विविध प्रशासकीय अधिकारी, विद्यार्थी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.




