ठळक बातम्या

    वणी विधानसभा क्षेत्रातील विकासकामांसाठी आमदार संजय देरकर यांचा शासनाकडे विविध मागण्यांचा आग्रह

    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

     वणी : जिल्हा वार्षिक योजना बैठकीत वणी विधानसभा क्षेत्रातील विविध विकासकामे, नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि शेतकरी तसेच ग्रामीण भागातील प्रश्नांबाबत आमदार संजय देरकर यांनी शासनाचे लक्ष वेधले. वणी, मारेगाव व झरी-जामणी तालुक्यांतील रस्ते, आरोग्य, जलसंधारण, वनविकास, वीजपुरवठा, नगरविकास आणि इतर मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न त्यांनी ठामपणे मांडले.

    मारेगाव व झरी-जामणी नगरपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणावर शेतकरी वास्तव्यास असून त्यांच्या शेतांकडे जाणारे शेत व पाणंद रस्ते बळीराजा शेत/पाणंद रस्ता योजनेतून करता येतात का, तसेच नगरपंचायत हद्दीसाठी याबाबत शासनाचे स्पष्ट आदेश आहेत का, याबाबत आमदारांनी स्पष्टीकरण मागितले.

    मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत वणी विधानसभा क्षेत्राला आवश्यक रस्त्यांची लांबी मंजूर का करण्यात आली नाही, तसेच बळीराजा शेत/पाणंद रस्ता योजनेत वणी विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक रस्त्यांची लांबी असतानाही यवतमाळ विधानसभा क्षेत्राच्या तुलनेत वणीला कमी निधी का देण्यात आला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

    ग्रामीण आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष देण्याची मागणी

    वणी ग्रामीण रुग्णालयात आवश्यक मनुष्यबळ, औषधसाठा व इतर सुविधांचा अभाव असल्याचे निदर्शनास आणून देत, वैद्यकीय अधीक्षकांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र दिले असतानाही आवश्यक सुविधा अद्याप उपलब्ध नसल्याबाबत आमदारांनी शासनाकडे तातडीच्या कार्यवाहीची मागणी केली.

    वणी तालुक्यातील कायर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधीक्षकांची दोन पदे आणि औषधनिर्मात्याचे एक पद रिक्त असल्याने ही पदे तातडीने भरण्याची मागणीही करण्यात आली.

    तसेच वणी तालुक्यातील शिंदोला हे सुमारे १५ गावांसाठी मध्यवर्ती ठिकाण असून परिसरात माईन्स असल्याने आरोग्यसेवेची गरज अधिक आहे. त्यामुळे शिंदोला येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देऊन डॉक्टर, कर्मचारी, औषधे, प्रयोगशाळा, प्रसूती व आपत्कालीन सेवा उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.

    मारेगाव व वणी शहरातील विकासकामांना निधीची मागणी

    नगरोत्थान योजनेअंतर्गत मारेगाव नगरपंचायतीस आवश्यक निधी मंजूर करून विकासकामांना गती देण्यात यावी, अशी मागणी आमदारांनी केली.

    वणी नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १४ मध्ये रस्ते, नाल्या, पाणीपुरवठा, स्वच्छता, पथदिवे आणि इतर मूलभूत नागरी सुविधांचा अभाव असल्याने या प्रभागाच्या विकासासाठी नगरोत्थान योजनेतून विशेष निधी मंजूर करण्याची मागणी त्यांनी केली.

    जलसंधारण व भूजल पातळीबाबत ठोस उपाययोजनांची मागणी

    वणी विधानसभा क्षेत्रातील भूजल पातळी दिवसेंदिवस खालावत असल्याने डीपीडीसी, मृद व जलसंधारण विभाग अथवा इतर उपलब्ध निधीतून महसूल विभागाच्या जागेवर तलाव व जलसाठे निर्माण करण्याची व्यापक मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली. जिल्हा नियोजन समितीमार्फत यासाठी कोणती कार्यवाही करण्यात येणार आहे, याबाबतही त्यांनी शासनाकडून स्पष्ट भूमिका मागितली.

    वनविकास व पर्यटनाला चालना देण्याचा आग्रह

    वणी विधानसभा क्षेत्रातील वनक्षेत्राच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत वन विभागाला आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. तसेच अडकोली-पवनार परिसरात वन्यजीव सफारी सुरू करण्यासाठी शासन स्तरावर प्रस्ताव सादर करून आवश्यक निधी मंजूर करावा, अशी मागणी आमदारांनी केली.

    वणी तालुक्यातील कवडशी येथे इको-टुरिझम विकसित करण्यासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करून शासनाकडे प्रस्ताव सादर करावा, तसेच या प्रकल्पातून स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली.

    शेतकऱ्यांना तातडीने ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून देण्याची मागणी

    महावितरणच्या कृषी पंपांसाठी नादुरुस्त झालेले ट्रान्सफॉर्मर बदलण्यासाठी शेतकऱ्यांना एक ते दीड महिना प्रतीक्षा करावी लागत असल्याने पिकांना वेळेवर पाणी देता येत नाही. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे कृषी पंपांचे नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर तातडीने बदलण्यासाठी स्वतंत्र व प्रभावी यंत्रणा उभी करावी आणि प्रतीक्षा कालावधी कमी करावा, अशी मागणी आमदार संजय देरकर यांनी केली.

    मारेगाव तालुक्यात स्मशानभूमीच्या सुविधांचा प्रश्न

    मारेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये अद्याप पुरेशा व सोयीसुविधायुक्त स्मशानभूमी उपलब्ध नसल्याने नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. अलीकडेच ग्रामपंचायतीसमोर अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर, स्मशानभूमीची आवश्यकता असलेल्या गावांची संख्या निश्चित करून स्मशानभूमी शेड, पाणी, रस्ता, विद्युत व्यवस्था व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली.

    मूर्ती-बोरी पुलासाठी तातडीने निधीची मागणी

    वणी तालुक्यातील पैनगंगा नदीकाठच्या मूर्ती गावाचा पावसाळ्यात वारंवार संपर्क तुटतो. मूर्ती-बोरी रस्त्यावरील नाल्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने गावाचा तालुका व जिल्ह्याशी संपर्क खंडित होतो. आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने या पुलाचे बांधकाम अत्यंत आवश्यक असल्याने मूर्ती-बोरी रस्त्यावरील पुलासाठी तातडीने निधी उपलब्ध करून बांधकाम सुरू करावे, अशी मागणी आमदारांनी केली.

    आमदार संजय देरकर यांनी जिल्हा वार्षिक योजना बैठकीत मांडलेल्या या प्रश्नांमधून वणी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी, ग्रामीण नागरिक, कामगार, आदिवासी व दुर्गम भागातील नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. संबंधित विभागांनी या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेऊन प्रत्यक्ष कामांना सुरुवात करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

    Photo