ठळक बातम्या

    ड्रायक्लीनिंग व्यावसायिकाने परत केले सात तोळे सोने; प्रामाणिकपणाचा नवा आदर्श घालून देणाऱ्या अमोल काटकर यांचा नागरिकांकडून सत्कार

     

    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    हडपसर : हडपसर येथील ड्रायक्लीनिंगचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यावसायिकाने आपल्या प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला आहे. कपडे ड्रायक्लीनिंगसाठी आलेल्या पॅन्टच्या खिशात राहिलेले सोन्याची चैन आणि अंगठ्या असा सुमारे सात तोळे सोन्याचा ऐवज त्यांनी संबंधित व्यक्तीला प्रामाणिकपणे परत केला.हडपसरमधील सातवाडी परिसरात काटकर यांचा ड्रायक्लीनिंगचा व्यवसाय आहे. दि. २२ ऑगस्ट रोजी परिसरातील देविदास इंदलकर यांनी कपडे ड्रायक्लीनिंगसाठी दिले होते. कपडे देताना इंदलकर यांच्या लक्षात आले नव्हते की, त्यांच्या पॅन्टच्या खिशात सोन्याची चैन आणि अंगठ्या असा सुमारे सात तोळे सोन्याच्या वस्तू राहिल्या आहेत.

    कपडे ड्रायक्लीनिंग करताना काटकर यांच्या निदर्शनास पॅन्टच्या खिशात काही वस्तू असल्याचे आले. खिशात सोन्याचे दागिने असल्याचे लक्षात येताच त्यांनी प्रामाणिकपणाचे दर्शन घडवत तात्काळ इंदलकर यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर सोन्याचे दागिने संबंधित इंदलकर यांना परत करण्यात आले.

    या प्रामाणिक कृत्याबद्दल काटकर यांचे परिसरात कौतुक होत असून, नागरिकांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार केला. आजच्या काळात मौल्यवान ऐवज प्रामाणिकपणे परत करून अमोल काटकर यांनी समाजासमोर प्रामाणिकपणाचा एक नवा आदर्श घालून दिल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

    Photo