विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : प्राचीन भारतात कौशल्यपूर्ण शिक्षण स्वरूपात प्रदीर्घ काळापासून प्रचलित असणाऱ्या, मानवी जीवनाला सुंदर, संपन्न, संस्कारित, अभिजात रसास्वादसंपन्न आणि स्वावलंबी करणाऱ्या ६४ कलांचा परिचय करून देण्याच्या निमित्ताने संस्कृत भारती शाखा वणी आणि लोकमान्य टिळक महाविद्यालयाचा संस्कृत विभाग यांच्यावतीने संस्कृत सप्ताहाच्या निमित्ताने स्थानिक जैताई देवस्थान मध्ये आयोजित करण्यात आलेल्या ६४ कला प्रदर्शनी ला वणीकर जनतेचा उस्फूर्त आणि भरघोस प्रतिसाद प्राप्त झाला.
सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा तरुण भारताचे प्रतिनिधी गजानन कासावार यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून या प्रदर्शनीचे उद्घाटन झाले. याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळ वणीचे सहसचिव श्री अशोक सोनटक्के तथा संस्कृत भारतीच्या प्रांत कार्यकारिणी सदस्य प्रणिता भाकरे विशेषत्वाने उपस्थित होत्या.
अत्याधुनिक काळात देखील स्वयंरोजगाराच्या विविध संधी या कलांच्या माध्यमातून कशा प्राप्त होऊ शकतात हे पाहून प्रेक्षकांनी विशेष प्रसन्नता व्यक्त केली.
संस्कृत भारती शाखा वणीचे नगर अध्यक्ष तथा लोकमान्य टिळक महाविद्यालय संस्कृत विभाग प्रमुख विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नातून साकारलेल्या या प्रदर्शनीमुळे केवळ नाव माहिती असलेल्या या ६४ नेमक्या कोणत्या होत्या? त्यांचे स्वरूप कसे होते ?आणि आजच्या काळात देखील ते कसे उपयुक्त आहे? हे प्रथमच जाणता आले अशा स्वरूपातील अनेक प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रिया उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या ठरल्या.
आपल्या पूर्वजांनी किती वेगवेगळ्या विषयात किती सूक्ष्म आणि किती व्यापक विचार करून ठेवलेला आहे ते पाहून प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर प्रगटलेला विस्मय आणि आश्चर्याचा भाग तथा अभिमान ही प्रदर्शनीची खरी उपलब्धी आहे.
प्रदर्शनीच्या यशस्वीतेसाठी संस्कृत भारतीचे उपाध्यक्ष प्रशांत भाकरे, सचिव महेश पुंड, प्रा. प्रीतम सरग, सुनील इंदुवामन ठाकरे, सुखदा बुजोणे यांनी विशेष परिश्रम घेतले.




