ठळक बातम्या

    *ग्रंथालय हे संस्कार देणारे क्षेत्र- सुरेंद्र विधाते* सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघाचा वर्धापन दिन साजरा


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

     वणी: ग्रंथालय क्षेत्र हे संस्कार देणारे क्षेत्र आहे. आपण सदैव आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक असले पाहिजे. याही क्षेत्रात खूप मोठा संघर्ष आहे. म्हणून आपण संघटित असले पाहिजे. ग्रंथ सर्वांवर संस्कार करतात. वाचाल तर वाचाल हे त्रिकालाबाधित सत्य आहे. ही संस्कृती टिकवण्याचे कार्य संघटना करत आहे.

    असे प्रतिपादन वणी, मारेगाव, झरी सार्वजनिक ग्रंथालय

    कर्मचारी संघाचे अध्यक्ष सुरेंद्र विधाते यांनी केले. यावेळी विचारपिठावर साहित्यिक तथा वक्ते सुनील इंदुवामन ठाकरे, उपाध्यक्ष देवेंद्र भाजीपाले, सचिव प्रमोद लोणारे उपस्थित होते. 

    पुढे बोलताना विधाते म्हणाले की, कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. त्यावर सकारात्मक तोडगा निघायला हवा. यासह संघटनेच्या विविध कार्यांवर यांनी चर्चा केली. 

    संघटनेचे उपाध्यक्ष देवेंद्र भाजीपाले यांनी ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा केली. ग्रंथालय कर्मचारी सर्वच स्तरांतून संघटनेच्या वाढीसाठी करत असलेले प्रयत्न यावर भाष्य केले. 

    साहित्यिक तथा वक्ते सुनील इंदुवामन ठाकरे यांनी स्थानिक ग्रंथ चळवळीवर विवेचन केले. प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक मिळाला पाहिजे. सोबतच प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ मिळाला पाहिजे, याचा आग्रह धरला. ठाकरे ह्यांनी ग्रंथालय संघटनेच्या अनुषंगाने विविध विषयांवर प्रकाश टाकला. 

    कार्यक्रमाचे प्रस्ताविक शुभम कडू यांनी तर संचालन प्रमोद लोणारे यांनी केले. आभार गजानन कोकुर्डे यांनी मानले. नगर वाचनालय वणी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले वाचनालय वणी, सिद्धी वाचनालय वणी,  कुंभा येथील विवेकानंद वाचनालय, रामकृष्ण विवेकानंद मंडळ वाचनालय वणीचे ग्रंथपाल, कर्मचारी उपस्थित होते. आ

    योजनाची बाजू राम मेंगावार, गुरु माउली संत बाजीराव महाराज सार्वजनिक वाचनालय  हिरापूरचे ग्रंथपाल अरविंद दुधलकर, सिद्धी सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल सुभाष राखुंडे, स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय कुंभाचे ग्रंथपाल गजानन कोकुर्डे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले वाचनालयाचे ग्रंथपाल शुभम कडू, रामकृष्ण विवेकानंद मंडळ वाचनालयाचे कर्मचारी अमोल पेटकर यांनी सांभाळली. वृक्षारोपणाने कार्यक्रमाची सांगता झाली.

    Photo