ठळक बातम्या

    कोल डेपो, ओव्हरलोड वाहतूक व प्रदूषणाविरोधात नागरिकांचा एल्गार; १० दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

     जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; सोमनाळा ते चिखलगाव चौफुली परिसरातील नागरिकांच्या कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी

    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : सोमनाळा ते चिखलगाव चौफुली या मुख्य मार्गावरील कोल डेपो, कोल वॉशरी, ओव्हरलोड कोळसा वाहतूक, वाढते धूळ प्रदूषण, वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आता थेट प्रशासनाविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. जिल्हाधिकारी यवतमाळ यांना उपविभागीय अधिकारी, वणी यांच्या मार्फत सविस्तर निवेदन सादर करून १० दिवसांच्या आत सर्व संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा नागरिकांनी दिला आहे.

    सोमनाळा, निंबाळा, झरपट, राजूर, भांडेवाडा, सोनापूर, पळसोनी, मेघदूत कॉलनी, कळमना (लालपुलिया) आणि चिखलगाव येथील नागरिकांनी संयुक्तपणे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या मार्गावर मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या कोल डेपो, कोल वॉशरी आणि डोलोमाईट उद्योगांमुळे परिसरात प्रचंड धूळ पसरत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. श्वसनाचे आजार वाढत असून शेतकरी, विद्यार्थी आणि वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

    रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभ्या राहणाऱ्या अवजड वाहनांमुळे वाहतूक वारंवार खोळंबते. ओव्हरलोड वाहतूक, राँग साईडने धावणारे ट्रक आणि नियमांचे सातत्याने होणारे उल्लंघन यामुळे गंभीर अपघातांचा धोका वाढला असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

    निवेदनात सोमनाळा ते चिखलगाव चौफुली मार्गावर स्पीड ब्रेकर, डिव्हायडर, दिशादर्शक फलक व सुरक्षा चिन्हे बसविणे, कळमना (लालपुलिया) येथे एस.टी. बसथांबा मंजूर करणे, चिखलगाव चौफुली येथे कायमस्वरूपी वाहतूक पोलीस, सिग्नल व पोलीस मदत केंद्र सुरू करणे, निवासी भागातील कोल डेपोची चौकशी करून नियमबाह्य डेपो हटविणे, ओव्हरलोड आणि राँग साईड वाहतुकीवर कठोर कारवाई करणे, धूळ प्रदूषण रोखण्यासाठी नियमित पाणी फवारणी व झाकून वाहतूक सक्तीची करणे, तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, परिवहन, पोलीस आणि महसूल विभागाच्या संयुक्त समितीकडून संपूर्ण परिसराची पाहणी करून अहवाल सादर करण्याची मागणी करण्यात आली आहे.

    या निवेदनावर प्रवीण खानझोडे, राहुल क्षीरसागर, राहुल कुत्तरमारे, अनिल डवरे, मनोज ढेंगळे, ॲड. कुमार मोहरमपुरी, ॲड. अरविंद सिडाम, मारोती आत्राम, सुभाष लसंते, तुकाराम माथणकर (सरपंच), शिवाजी मोरे, अतुल चांदेकर, इमामुल हुसेन, प्रकाश भट, आशिष रिंगोले, लेजू मडावी, कृष्णा चलाख, मंगेश येटे, राजेश चांदेकर, शंकर धांडे, आकाश दुबे, जफर खान, अशोक अंकतवार, संजय जाधव, रोशन गारपेलिवार यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असून परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    नागरिकांच्या या भूमिकेमुळे आता प्रशासन पुढील दहा दिवसांत कोणती ठोस पावले उचलते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

    Photo