ठळक बातम्या

    राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांची बीजे लोकमान्यांच्या चिंतनात- डॉ. मंजुश्री सरदेशपांडे

    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

     वणी : " स्वराज्य, स्वातंत्र्य, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण या चतु:सूत्रीची उद्घोषणा करीत, भारतीयांच्या सर्वांगीण उत्थानासाठी भारतीय मनोवृत्तीने संपूर्ण असणारे शिक्षण देण्यासाठीच डेक्कन एज्युकेशन सोसायटी, फर्ग्युसन महाविद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल या सारख्या संस्थांची स्थापना करीत, स्वतःवर ठाम विश्वास असणारी आणि विचार करणारी पिढी निर्माण करण्यासाठीचे लोकमान्यांचे विचार , राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून आपल्याला आजही स्वीकार्ह वाटतात हेच लोकमान्य यांचे कालातीतत्व आहे." असे विचार आर एस मुंडले कला आणि वाणिज्य महाविद्यालय धरमपेठ नागपूर येथील प्राचार्य डॉ. मंजुश्री सरदेशपांडे यांनी व्यक्त केले. 

              शिक्षण प्रसारक मंडळ वणी संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथे आयोजित ६२ व्या लोकमान्य टिळक व्याख्यान सत्रात " कालातीत लोकमान्य" या विषयावर त्या व्यक्त होत होत्या. 

              याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळ वणीचे उपाध्यक्ष नरेंद्र बरडिया तथा सहसचिव अशोक सोनटक्के, अजून सदस्य प्रमोद देशमुख,अनिल जयस्वाल, मूलचंद जैन, प्राचार्य प्रसाद खानझोडे, प्राचार्य सुधाकर रेड्डी हे मान्यवर उपस्थित होते.

               प्रास्ताविकामध्ये प्राचार्य प्रसाद खानझोडे यांनी, लोकमान्यांनी केलेल्या स्वाक्षरीला त्या काळात एक हजार रुपयाचे मूल्य प्राप्त झाल्याने अशी अक्षरे ही प्रेरणाक्षरे ठरतात हे सांगत, त्यांच्या स्मृतीचा वारसा ६२ वर्ष जपत असल्याचा अभिमान व्यक्त करीत वक्त्यांचा परिचय करून दिला.

    आपल्या शांत,संयमी आणि अभ्यासपूर्ण मांडणीमध्ये डॉ. सरदेशपांडे यांनी, भाषा विसरलो तर आयुष्य मर्यादित होते. आपण संस्कृत पासून दुरावणे आपले दुर्दैव आहे. थोरो किंवा इमर्सन वाचल्यावर हे तत्व चिंतन भारतीयांनी किती पूर्वी आणि किती व्यापक केले हे लक्षात येते. ज्ञान हे असीम असल्याने पेटंट घेण्याची भूमिकाच भारतात नव्हती. पाश्चात्य देशात गॅलेलिओला सत्य कथनासाठी विश्वप्राशन करावे लागले पण भारतामध्ये चार्वाकाला सुद्धा दर्शनात स्थान देणारी व्यापक वृत्ती आरंभापासून आहे. अशा विविध पैलूंच्या आधारे त्याबाबतीतील लोकमान्यांचे विचार आणि त्या आधारे त्यांचे कालातीतत्व अधोरेखित केले. 

             अध्यक्षीय मनोगतामध्ये नरेंद्र बरडिया यांनी मागून येणाऱ्यांच्या पायातील काटे स्वतः पुढे चालत झेलणाऱ्या रामचंद्रांसारख्या नेतृत्वाची आपल्याला गरज आहे असे सांगत लोकमान्य आदर्श स्वरूपात स्थापन केलेल्या विचारांच्या आधारे समाज गुरु आणि पालक या सगळ्यांनी आपली उत्तरदायित्व स्वीकारत उत्तम राष्ट्रनिर्मितीसाठी प्रयत्न करायला हवा यावर जोर दिला.

              कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अंजली आत्राम यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. किसन घोगरे यांनी केले.

    Photo