स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलिस कर्मचारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर
विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : समाजाच्या सुरक्षिततेसाठी दिवस-रात्र कर्तव्य बजावणारे पोलिस कर्मचारी आणि प्रशासनातील अधिकारी यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने चोरडिया हॉस्पिटलतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेले मोफत आरोग्य तपासणी शिबिर हा एक स्तुत्य आणि समाजोपयोगी उपक्रम ठरत आहे. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे शहरातील विविध स्तरांतून स्वागत होत असून, चोरडिया हॉस्पिटलच्या सेवाभावी कार्याचे कौतुक व्यक्त केले जात आहे.
सामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा देतानाच समाजासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारण्याचा चोरडिया हॉस्पिटलचा हा उपक्रम प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त होत आहे. नियमित आरोग्य तपासणीमुळे अनेक गंभीर आजारांचे वेळेत निदान होऊन योग्य उपचार शक्य होत असल्याने अशा शिबिरांचे महत्त्व अधिक अधोरेखित होत आहे.
या शिबिरामध्ये ईसीजी, छातीचा एक्स-रे, सीबीसी, लिपिड प्रोफाइल, HbA1c, एफबीएस, सीरम क्रिएटिनिन तसेच थायरॉईड फंक्शन टेस्ट यांसह विविध महत्त्वाच्या तपासण्या करण्यात येणार असून, तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्यविषयक मार्गदर्शनही दिले जाणार आहे. त्यामुळे पोलिस कर्मचारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या आरोग्याविषयी योग्य सल्ला व आवश्यक उपचारांचे मार्गदर्शन मिळणार आहे.
समाजाप्रती संवेदनशीलता आणि निस्वार्थ आरोग्यसेवेची परंपरा जपणारे डॉ. रोहित डी. चोरडिया व चोरडिया हॉस्पिटलची संपूर्ण टीम यांचे विविध सामाजिक, प्रशासकीय आणि नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत असून, भविष्यातही असे समाजहिताचे उपक्रम सातत्याने राबवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


