विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी (यवतमाळ) : वणी व शिरपूर येथील १०० वर्षांपेक्षा जास्त जुन्या आणि जीर्ण झालेल्या पोलीस स्टेशन व पोलीस वसाहत इमारतीच्या प्रश्नावर अखेर हालचालींना वेग आला आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर, बल्लारपूरचे आमदार व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणात थेट हस्तक्षेप करून राज्याच्या गृह विभागाला प्रशासकीय मान्यता व निधी तातडीने मंजूर करण्याचे निर्देश दिले आहेत.
काय आहे प्रकरण?
विजय पिदुरकर यांनी दिनांक २४/०९/२०२५ रोजी आमदार सुधीर मुनगंटीवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, वणी व शिरपूर येथील पोलीस कार्यालय व वसाहत इमारत १०० वर्षांहून जुनी असून अत्यंत धोकादायक झाली आहे. अनेक ठिकाणी इमारतीची पडझड होत असून कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात आहे. २०१७ पासून २०२३ पर्यंत पोलीस महासंचालक मुंबई व जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही या मागणीची पूर्तता झाली नव्हती.
वणी पोलीस स्टेशन अंतर्गत ६ अधिकारी व ८४ अंमलदार आणि शिरपूर येथे २ अधिकारी व ३४ अंमलदार असे एकूण ११९ कर्मचारी कार्यरत आहेत. निवासी सुविधा अपुऱ्या असल्याने अनेक कर्मचारी भाड्याच्या घरात राहत आहेत. वणी हे व्यापारी, कोळसा, सिमेंट, डोलोमाइट, लाइमस्टोन उद्योगाचे मोठे केंद्र असून तालुक्याची लोकसंख्या ३ लाखांपेक्षा जास्त आहे. वाढती लोकसंख्या व खनिज संपत्तीमुळे कायदा-सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे शिफारस
विजय पिदुरकर यांच्या निवेदनाची दखल घेत सुधीर मुनगंटीवार यांनी दिनांक २४ जुलै २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र लिहून वणी व शिरपूर येथे आधुनिक व सुसज्ज पोलीस स्टेशन व निवासस्थाने उभारणे अत्यावश्यक असल्याचे नमूद केले.
त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाच्या निर्देशानुसार मुनगंटीवार यांनी दिनांक १९ ऑगस्ट २०२६ रोजी (जावक क्र. ७५४१) अपर मुख्य सचिव, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई यांना पत्र पाठवून स्पष्ट निर्देश दिले आहेत की -
"वणी व शिरपूर येथील नवीन पोलीस स्टेशन इमारत व पोलीस निवासी वसाहत इमारतीस तातडीने प्रशासकीय मान्यता देऊन आवश्यक निधी मंजूर करण्यात यावा, तसेच संबंधित बांधकाम विभागास बांधकामाची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याबाबत आवश्यक निर्देश द्यावेत."
या पत्राची प्रत पोलीस अधीक्षक यवतमाळ व विजय पिदुरकर यांनाही देण्यात आली आहे.
या निर्णयामुळे वणी व शिरपूर परिसरातील पोलीस कर्मचाऱ्यांना सुरक्षित निवारा व कामासाठी सुसज्ज इमारत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, नागरिकांना अधिक जलद व दर्जेदार पोलीस सेवा मिळण्यास मदत होणार आहे.
