विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : लालपुलिया परिसरातील कोळसा प्लॉटधारक, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक, ढाबा चालक तसेच अन्य व्यावसायिकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून त्यावर योग्य तोडगा काढण्यासाठी आमदार संजय देरकर यांच्या अध्यक्षतेखाली वणी पोलीस स्टेशन येथे बैठक घेण्यात आली. कोळसा वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या, वाहतूक व्यवस्थेतील अडचणी, रस्त्यावर साचणारी माती तसेच नागरिकांना होणारा त्रास याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
लालपुलिया परिसरात कोळसा वाहतूक करणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने रस्त्यावर माती साचणे, वाहतुकीला अडथळा निर्माण होणे तसेच नागरिकांना आणि इतर वाहनचालकांना त्रास होणे, या बाबी बैठकीत मांडण्यात आल्या. याची गंभीर दखल घेत रस्त्यावर साचलेली माती तातडीने साफ करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना आमदार संजय देरकर यांनी संबंधितांना दिल्या. तसेच वाहतूक सुरक्षित व सुरळीत राहण्यासाठी लालपुलिया परिसरात आवश्यक त्या ठिकाणी ब्रेकरची व्यवस्था करण्यात यावी, असेही त्यांनी निर्देशित केले.
कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकांमधून कोळसा रस्त्यावर पडू नये तसेच धुळीचा त्रास होऊ नये, यासाठी प्रत्येक ट्रकवर ताडपत्री व्यवस्थित बांधणे आवश्यक असल्याचे आमदारांनी स्पष्ट केले. प्लॉटधारकांनी ट्रकवर ताडपत्री व्यवस्थित बांधल्याची खात्री केल्यानंतरच ट्रक परिसरातून बाहेर सोडावा, अशा सूचना देण्यात आल्या. यासोबतच संबंधित ट्रकची बिल्टीदेखील त्याच ठिकाणी देण्याची व्यवस्था करण्यात यावी, जेणेकरून वाहतूक व्यवस्थेत शिस्त राहील आणि अनावश्यक गोंधळ टाळता येईल, असेही सांगण्यात आले.
“व्यवसाय करताना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना प्रथम समज देण्यात यावी. मात्र, समज देऊनही वारंवार नियमांचे उल्लंघन होत असेल तर संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी. कोळसा वाहतूक सुरू राहणे आवश्यक असले तरी त्याचा त्रास परिसरातील नागरिकांना होता कामा नये. नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्था याला सर्वांनी प्राधान्य द्यावे,” असे आमदार संजय देरकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
लालपुलिया परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध करण्यासाठी पोलीस प्रशासन, कोळसा प्लॉटधारक आणि ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी परस्पर समन्वय ठेवून काम करण्याची गरज असल्याचेही बैठकीत अधोरेखित करण्यात आले. कोळसा वाहतुकीशी संबंधित नियमांचे काटेकोर पालन झाल्यास वाहतूक कोंडी, रस्त्यावर माती साचणे तसेच धुळीमुळे होणारा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. त्यामुळे संबंधित सर्व व्यावसायिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन आमदारांनी केले.
परिसरातील नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता त्यावर तातडीने उपाययोजना कराव्यात. वाहतुकीमुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, यासाठी संबंधित यंत्रणांनी नियमित पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही आमदार संजय देरकर यांनी दिल्या.
बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवी, ठाणेदार भानुदास पिदुरकर, ट्राफिक पोलीस निरीक्षक नरेश रणधीर यांच्यासह गणपत लेडांगे, अजय ढोबे, मनीष बत्रा आदी उपस्थित होते. तसेच लालपुलिया परिसरातील कोळसा प्लॉटधारक, ट्रान्सपोर्ट मालक, ढाबा चालक आणि अन्य व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीमुळे लालपुलिया परिसरातील कोळसा वाहतूक अधिक शिस्तबद्ध करण्यासोबतच व्यावसायिकांचे हित आणि परिसरातील नागरिकांची सुरक्षितता यांचा समतोल साधण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

