विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी: दि. ३१ ऑगस्ट : साहित्य अकादेमी, नवी दिल्ली, लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी आणि विदर्भ साहित्य संघ, शाखा-वणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘युवा साहिती’ (मराठी कविता-वाचन) कार्यक्रम लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी येथे उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. नरेंद्रजी बरडीया, उपाध्यक्ष, शिक्षण प्रसारक मंडळ, वणी हे होते. तसेच डॉ. प्रसाद खानझोडे, प्राचार्य, लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तसेच डॉ. अभिजित अणे, अध्यक्ष, विदर्भ साहित्य संघ, शाखा-वणी यांची प्रमुख उपस्थित होती. कार्यक्रमात स्वागतपर भाषण डॉ. प्रमोद मुनघाटे, सदस्य, सामान्य परिषद, साहित्य अकादमी, नवी दिल्ली यांनी केले.
या कार्यक्रमात युवा कवींनी आपल्या दर्जेदार आणि आशयघन कवितांचे वाचन करून उपस्थितांची मने जिंकली. पुनीत मातकर, यवतमाळ, मीनाक्षी गोरंटीवार (वणी), अविनाश पोइकर (चंद्रपूर), गीता रायपुरे (चंद्रपूर) आणि दिलीप अलोणे (वणी) या कवींनी या साहित्यामध्ये आपल्या दर्जेदार व अंतर्मुख करणाऱ्या कविता सादर करून रसिकांची मने जिंकली.
उदयोन्मुख आणि प्रस्थापित कवींना त्यांच्या अभिव्यक्तीसाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि काव्यानंदात रसिकांनी नहावे या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात काव्याच्या विविध छटा रसिकांनी अनुभवल्या आणि युवा साहित्यिकांच्या प्रतिभेला वाव मिळाला. विविध विषयांवरील कविता, सामाजिक जाणीवा आणि समकालीन जीवनाचे प्रतिबिंब या कविता-वाचनातून प्रभावीपणे उमटले. साहित्यिक अभिरुची जपणाऱ्या या साहित्याचे सूत्रसंचालन आणि आभार प्रा. बाळा मालेकर यांनी केले.
कार्यक्रमाला साहित्यप्रेमी, प्राध्यापक, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. वणीतील साहित्य क्षेत्राला ऊर्जितावस्थेला नेणाऱ्या हा उपक्रम केवळ वणीतच नव्हे तर विदर्भात चर्चेचा विषय ठरला.


