ठळक बातम्या

    वणी पोलिसांची धडक कारवाई; ६.७२ लाखांचे सोन्याचे दागिने चोरीप्रकरण उघडकीस, १६ वर्षीय विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात

     आयफोन १६ प्रो खरेदीसाठी घरफोडी; ५२ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त, एक आरोपी अटकेत तर एक फरार


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : शहरातील कनकवाडी परिसरात घरफोडी करून तब्बल ६ लाख ७२ हजार रुपये किमतीचे ५२ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरी केल्याची घटना वणी पोलिसांनी उघडकीस आणली आहे. विशेष म्हणजे, आयफोन १६ प्रो खरेदी करण्याच्या इच्छेतून १६ वर्षीय विधीसंघर्षग्रस्त बालकाने चोरी केल्याचे तपासात समोर आले आहे.

    फिर्यादी बंडू विठोबा बोढाले (वय ६२, रा. कनकवाडी, वणी) यांनी १ सप्टेंबर रोजी दिलेल्या तक्रारीनुसार, २० ऑगस्ट ते २१ ऑगस्टदरम्यानच्या रात्री त्यांच्या घरात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून लोखंडी कपाटाचे लॉक तोडले. त्यातील सोन्याचे दागिने असा एकूण ५२ ग्रॅम वजनाचा व ६ लाख ७२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला होता. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८६१/२०२६, कलम ३०५(अ), ३३१(४) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

    पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान संशयित विधीसंघर्षग्रस्त बालक तसेच गुणवंत उर्फ पोलार्ड पांडुरंग दानव (वय २३, रा. विठ्ठलवाडी, वणी) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता चोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला.

    विधीसंघर्षग्रस्त बालकाने पंचांसमक्ष दिलेल्या माहितीनुसार, त्याला आयफोन १६ प्रो खरेदी करायचा असल्याने त्याने ही बाब आपल्या मित्रांना सांगितली. त्यानंतर गुणवंत उर्फ पोलार्ड पांडुरंग दानव आणि सुरज हुसेन गेडाम (वय २५, रा. देहगाव विरगुंड, ता. वणी, जि. यवतमाळ) यांनी त्याला प्रोत्साहित करून घरातील दागिने चोरी करण्यास प्रवृत्त केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

    चोरी केलेले सोने विक्री करण्याच्या उद्देशाने चंद्रपूर किंवा नागपूरकडे जाण्याचा प्रयत्न करत असताना, २ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे २ वाजता विधीसंघर्षग्रस्त बालक व अटक आरोपी पोलिसांच्या हाती लागले.

    पोलिसांनी त्यांच्याकडून लपवलेला  चपलाकंठी सोन्याचा हार (२५ ग्रॅम), मोठा सोन्याचा गोफ (१५ ग्रॅम), लहान सोन्याचा गोफ (५ ग्रॅम), कानातील टॉप्स (३ ग्रॅम व ४ ग्रॅम) असा एकूण ५२ ग्रॅम सोन्याचा मुद्देमाल, किंमत ६ लाख ७२ हजार रुपये, जप्त केला आहे. याप्रकरणी फरार आरोपी सुरज गेडाम याचा शोध सुरू आहे.

    ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश ढवळे तसेच पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सैयद साजिद आणि पोलीस कर्मचारी गजानन सावसाखडे, गणेश मेश्नाम, नंदकुमार पुप्पलवार, मोनेश्वर खंडे, रितेश भोयर यांनी केली.

    Photo