KPCL कंपनीच्या 84.41 हेक्टर वनभूमीतील अंदाजे 1.30 लाख मे. टन कोळसा उत्खननप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून दंडात्मक कारवाईचे वनमंत्र्यांचे आश्वासन
विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
मुंबई : दि. १ सप्टेंबर २०२६ : माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज भैया अहीर यांनी महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांची मुंबई मंत्रालयात भेट घेऊन बरांज कोळसा खाणीसह वनविभागाशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली.
यावेळी KPCLच्या बरांज कोळसा खाणीद्वारे 84.41 हेक्टर वनभूमीतील अंदाजे 1 लाख 30 हजार मे. टन कोळशाचे अटी-शर्तींचा भंग करून अवैधरित्या उत्खनन करण्यात आल्याचा मुद्दा हंसराज अहीर यांनी वनमंत्र्यांसमोर मांडला. कागदोपत्री पुरावे, विविध शासकीय पंचनामे तसेच वन अधिकाऱ्यांच्या अहवालातून हे प्रकरण स्पष्ट होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
वनभूमीचा गैरवापर करून करण्यात आलेल्या या कथित अवैध उत्खननामुळे वन संवर्धन कायदा 1980, भारतीय वन कायदा 1927 तसेच निस्तार हक्काचा भंग झाल्याचा आरोप करत KPCL कंपनीवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्याची मागणी अहीर यांनी केली.
या गंभीर प्रकरणाची वनमंत्र्यांनी दखल घेत उच्चस्तरीय चौकशी अहवालाच्या आधारे योग्य ती कारवाई करण्यात येईल. या प्रकरणात कोणतीही हयगय केली जाणार नाही, असे आश्वासन दिल्याची माहिती अहीर यांच्या भेटीनंतर देण्यात आली.
दरम्यान, या बैठकीत ‘चारा बँक’ या संकल्पनेवरही चर्चा झाली. वाया जाणारे गवत पशुधन तसेच गौमातेसाठी उपलब्ध करून देण्यासाठी चारा बँक उपयुक्त ठरू शकते. या विषयावर शासन सकारात्मक विचार करत असून, चारा बँकेचा विषय गांभीर्याने घेत असल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.

