ठळक बातम्या

    हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमातील महाप्रसाद, भंडाऱ्यांना प्रशासकीय जाचातून मुक्त ठेवा !

     महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि मंदिर विश्वस्तांची राज्य शासनाला निवेदनाद्वारे मागणी !

    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : हिंदूंच्या सण-उत्सवांतील 'महाप्रसाद आणि अन्नदान' प्रक्रियेवर अन्नसुरक्षेच्या नावाखाली होणाऱ्या एकतर्फी कारवाईबाबत; तसेच कायदेशीर समानतेच्या तत्त्वानुसार अन्नसुरक्षेचे नियम सर्व धर्मीयांसाठी समान लागू करावे, या विषयीचे निवेदन महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि शहरातील विविध मंदिर विश्वस्तांच्या वतीने आज दिनांक २ सप्टेंबर २०२६ उपविभागीय अधिकारी श्री. नितीनजी हिंगोले यांच्यामार्फत राज्य शासनाला पाठवण्यात आले.

    या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी आगामी गणेशोत्सव तसेच नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्नसुरक्षेच्या संदर्भात काही सूचना जारी केल्या आहेत. नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्न मिळणे आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन होणे ही निश्चितच महत्त्वाची बाब आहे आणि आम्ही त्याचे स्वागतच करतो.

    मात्र, या संदर्भात केवळ हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या ‘महाप्रसाद’, ‘भंडारा’ व ‘अन्नदान’ यांचाच विशेष उल्लेख करून परवाने, नोंदणी व कारवाईचा इशारा देणे, ही भूमिका अत्यंत पक्षपाती आणि संशयास्पद आहे. अन्नसुरक्षेचे नियम जर आवश्यक असतील, तर ते धर्म, पंथ किंवा सण यांचा भेद न करता सर्वांसाठी समानपणे लागू झाले पाहिजेत. प्रशासनाच्या या निवडक (Selective) कारवाईमुळे हिंदू समाजात तीव्र असंतोष निर्माण होत आहे. त्यामुळे त्यामुळे अन्नसुरक्षेचे नियम लागू करताना कोणत्याही एका धर्माच्या सण-उत्सवांना विशेष लक्ष्य करणे हे घटनाबाह्य आहे, भंडारा आणि महाप्रसाद' हा हिंदू धार्मिक आचरणाचा व सेवेचा एक अविभाज्य भाग आहे. त्यावर व्यावसायिक निकष लावून प्रशासकीय बंधने आणणे, हे धार्मिक स्वातंत्र्यावरील अतिक्रमण आहे, त्यामुळे महाप्रसाद व भंडाऱ्यांना प्रशासकीय जाचातून मुक्त ठेवावे, तसेच सार्वजनिक सण-उत्सवांमध्ये श्रद्धेने आणि सेवाभावाने आयोजित केले जाणारे अन्नदान हे 'व्यावसायिक खाद्यविक्रीपेक्षा' वेगळे आहे. त्यांना गुन्हेगारी स्वरूप देऊन व्यावसायिक परवान्यांची सक्ती करू नये. आम्ही अन्नसुरक्षेच्या नियमांना विरोध करत नाही; मात्र कायद्याची निवडक अंमलबजावणी करणे हा कायद्याचा भंग आहे. 

        मंदिरांमध्ये भक्तांच्या देणगीतून व सेवाभावातून चालणारे महाप्रसाद, भंडारे आणि अन्नदान ही भारतीय धार्मिक व सामाजिक परंपरेचा महत्त्वपूर्ण भाग आहेत. अन्नाची सुरक्षितता राखताना या सेवाभावी उपक्रमांमध्ये अनावश्यक अडथळे निर्माण होणार नाहीत, याची शासनाने दक्षता घ्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

    निवेदन देतांना महाराष्ट्र मंदिर महासंघ तालुका अध्यक्ष वणी- मारेगाव-झरी चे अनुराग काठेड जैन,श्री. जगन्नाथबाबा देवस्थान, भांदेवाडाचे श्री बबनराव धानोरकर, श्री कैलाश शिखर देवस्थान, शिरपूरचे श्री धीरज डाहुले, श्री भवानी माता देवस्थान, इजासन गोडगावचे श्री बालाजी म्हसे, वामन नांदे, श्री पूज्य सिंधी पंचायत गुरुद्वारा, वणीचे श्री रितेश शुगवानी, विनोद आसवानी, श्री श्रीराम मंदिर जागृती नगर वणीचे श्री अनुराग काठेड, कृष्णा पूरवार, श्री श्रीराम मंदिर  खाती चौक वणीचे श्री संदीप मदान, श्री श्याम बाबा मंदिर वणीचे सिन्टू अग्रवाल, श्री साई मंदिर यवतमाळ रोड वणीचे श्री निकेत गुप्ता, श्री नगाजी महाराज देवस्थान वणीचे श्री प्रशांत नक्षणे, श्री जय भोलेनाथ देवस्थान मारेगावचे श्री कैलाश दूधकोहळे, श्री विठ्ठल रुक्माई मंदिर वणीचे श्री सुरेश बनसोड, सनातन संस्था वणीचे श्री लहू खामनकर, लोभेश्वर टोंगे, उपस्थित होते.

    Photo