विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी: तान्हा पोळा नावाप्रमाणेच लहान मुलांचाच असतो. लाकडी बैलांना घेऊन तो साजरा करतात. त्याला मात्र तब्बल दोनशे वर्षांची परंपरा आहे. तान्ह्या पोळ्याच्या संदर्भात संत जगन्नाथ महाराजांचं स्मरण होतं. यवतमाळ जिल्ह्यातील वणीजवळ भांदेवाडा गाव आहे. तिथं त्यांची समाधी आहे. त्या मंदिरात जवळपास १०० लाकडाचे नंदीबैल ठेवले आहेत. त्याची कहाणी जगन्नाथ महाराजांचे भाऊ वसंतराव धानोरकर ह्यांनी दिली. संत जगन्नाथ महाराज हे लहानपणापासून लाकडी व दगडी नंदीबैलांसोबत खेळायचे. त्याच दरम्यान वेगाव येथील केशव पाटील देरकर ह्यांनी त्यांना खरेखुरे बैल भेट दिलेत. तिथूनच ते दमणीत म्हणजेच छोट्या बैलगाडीत बसायला लागलेत. पुढं चालून १९९६ पासून भांदेवाडा देवस्थानानं तान्ह्या पोळ्याला गावातून मोठी मिरवणूक सुरू केली. लहान मुलांसाठी १०० लाकडी नंदीबैल तयार करून घेतले. तान्ह्या पोळ्याची खरी कहाणी सुरू होते, नागपुरकर भोसलेंपासून.
युद्धाची तशी धामधूम नव्हती. जवळपास शांततेचाच काळ होता. सगळी प्रजा आपापल्या व्यवसाय, उद्योगात लागली होती. १८०६च्या काळात द्वितीय रघुजी राजे भोसले हे काही आठवड्यांवर आलेल्या पोळ्याच्या तयारीत लागले होते. रघुजी राजे भोसले हे शेतीला जीव लावणारे होते.
शेतकऱ्यांवर अपार माया करणारे होते. कलाप्रेम व सर्जनशिलतेचा गौरव हे त्यांच्यातील विशेष गुण होते. याच रसिकतेतून त्यांनी नागपूर शहरात तेलंगखेडीसारख्या अनेक बागा फुलविल्यात. शेती व शेतकरी हा त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता.
शेतीकडे ते केवळ व्यवसाय किंवा उद्योगच म्हणून पाहत नव्हते. तर ती एक परंपरा व संस्कृती होती त्यांच्यासाठी. ही परंपरा व संस्कृती नव्या पिढीनंदेखील जोपासली पाहिजे असा त्यांचा आग्रह व प्रयत्न असायचा. यातूनच उदयास आला ‘‘तान्हा पोळा’’.
शेती हा एक प्रमुख व्यवसाय होता. शेतकरी तन, मन, धनानं समर्पित होऊन शेतात आपले श्रम व समाधान रुजवत होते. शेती श्रेष्ठच होती त्या काळी. या देशात अनेक उत्सव पिकांसारखे शेतीतूनच फुललेत. मोठी माणसं जीव लावायची मातीला.
शेतीशी जुळलेले सर्वच घटक त्यांचे जीव की प्राण असायचे. त्यातील एक म्हणजे बैल. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा सणदेखील याच शेतीपरंपरेतूनच आलेला.
रघुजी राजे भोसले द्वितीय हे दूरदृष्टी असलेले लोकनेते होते. नव्या पिढ्यांना शेती व शेतीशी जुळलेले बैल यांच्याप्रती आस्था व रुची वाढावी म्हणून त्यांनी १८०६मध्ये तान्हा पोळा सुरू केला. श्रावण अमावस्येला महाराष्ट्रात पोळा साजरा होतो.
भारतभर विविधपद्धतीने शेतकरी आपल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करीतच असतात. खरेखुरे मोठमोठाले बैल घेऊन शेतकरी हा सण आजही साजरे करतातच. यात लहान मुलांचा विशेष काहीच रोल नसतो. ते बिचारे फक्त बघेच असतात. महाराजांना यातून एक कल्पना सुचली. त्यांनी लगेच ती अमलात आणली.
ती यशस्वी झाली. लहान मुलांसाठी त्यांनी तान्हा पोळा सुरू केला. लहान लेकरांना मोठा बैल सांभाळणं कठीण असतं. मग काय करायचं? तर त्यांनी लाकडाचा बैल तयार करवून घेतला.
नागपूरातील तेव्हाचे काष्ठशिल्पकार कायरकर यांच्याकडून खऱ्या बैलाएवढा लाकडाचा बैल त्यांनी बनवून घेतला.
जसा मोठ्या बैलांना घेऊन पोळा साजरा करतात, तसाच हा उत्सव त्यांनी सुरू केला. या लाकडी बैलांना चाकं लावली. त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली.
समोर मशाली घेतलेले घोडे असायचे. अर्थात तेही लाकडाचेच. मोठ्या पोळ्यातील सर्वच गोष्टी तान्ह्या पोळ्यात सुरू केल्यात. बैलांची पूजा वगैरे झाल्यावर ‘‘पोळा फुटला’’ अशी दवंडी दिली जायची. पोळा फुटल्यावर पुन्हा मिरवणूक काढली जायची. हा उत्सव खास लहान मुलांसाठी असायचा. मग महाराज लहान मुलांना मिठाई व भेटवस्तू देत.
पहिला लाकडी बैल बराच काळ उत्तम स्थितीत होता. एकदा वाड्याला आग लागली. त्या आगीत तो पहिला व अन्य लाकडी बैल जळून भस्मसात झालेत. पण एक छान माहिती मुधोजी राजेंनी दिली. ते म्हणाले की, घरात मुलगा जन्मला की त्याला त्याच्या पहिल्या पोळ्याला एक नवा लाकडी बैल मिळतो.
हे पोळ्याच्या परंपरेचं हॅण्डओव्हरच असतं. लाकडी बैल संपतीलही. काही काळाने ते नष्टही होतील. मात्र नव्या पिढीला आम्ही लाकडी बैलासोबत आपली परंपरा सोपवत असतो. लाकूड नष्ट होईल; पण ही परंपरा नष्ट होणार नाही, असा विश्वास मुधोजीराजेंनी दाखविला.
रघुजी राजे भोसले यांचे दहावे वंशज मुधोजी राजे भोसले यांनी या परंपरेची माहिती दिली. तंजावर, सातारा, कोल्हापूर व नागपूर ह्या भोसल्यांच्या प्रमुख गाद्या. भोसले चौफेर असले तरी तान्हा पोळा मात्र केवळ नागपुरकर भोसलेच साजरा करतात. पशूप्रेमाची पूर्वापार परंपरा विद्यमान मुधोजी राजेंनी जपली. त्यांच्या संग्रहात आजही उमदे घोडे, राजहंस, विविध पक्षी, प्राणी आहेत.
सन १८०६ पासून नागपूर व आता जवळपास संपूर्ण विदर्भातील काही भागांत तान्हा पोळा साजरा केला जातो. काळी व पिवळी मारबत काढली जाते. तिचादेखील एक स्वतंत्र इतिहास आहे. श्रीमंत राजे मुधोजीराव भोसले यांनीदेखील ही घराण्याची परंपरा जोपासली. त्यांच्या वाड्यात सर्वात मोठा लाकडी बैल जतन करून ठेवलेला आहे. त्या बैलाची उंची आठ फूट आणि लांबी सहा फूट आहे. त्या बैलाच्या पायात चांदीचे तोडे आहेत.
भोसले घराण्याने तान्ह्या पोळ्याची परंपरा सुरू केली. तेव्हापासून काष्ठशिल्पकारांना नवा रोजगार मिळाला. लाकडापासून बैलाचे शिल्प तयार करणाऱ्या पिढ्या तयार होऊ लागल्या आहेत. लाकडाच्या एका पाटीलाच आउटलाईन देऊन व चाक बसवून सर्वात स्वस्त लाकडी बैल तयार होतो. सागवान लाकडाचा हे बैल तयार करण्यासाठी उपयोग होतो.
एका सीमित आकारासाठी अखंड लाकूड वापरले जाते. मात्र बैल तयार कराताना त्याच्या उंचीनुसार दोन, तीन अथवा अधिक तुकड्यांचा वापर केला जातो. अगदी 100-200 रूपयांपासून तर लाख-दीड लाखांपर्यंत लाकडाचे बैल आहेत. दोन-चार महिन्यांपूर्वीच या कामाला सुरूवात होते.
विदर्भातील अनेक काष्ठशिल्पकार हे लाकडी बैल तयार करतात. पूर्वी जशी या लाकडी बैलांची क्रेज होती, तशी आता राहिली नाही. महागाईचाही फटका या उद्योगावर बसल्याचं काष्ठशिल्पकार राजू कायरकर म्हणाले.
तान्हा पोळा विदर्भात आणि त्यातही नागपूर भागात साजरा केला जातो. आपली शेतीची, पशुधनाची असलेली बांधिलकी व कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा अल्पसा प्रयत्न असतो. शेती हीच एक स्वतंत्र संस्कृती आहे. याच संस्कृतीमधून बहुतांश संस्कृती उदयास आल्यात. या संस्कृतीचं जतन, संवर्धन आणि हस्तांतरण होत आहे, ही आनंदाचीच बाब आहे. कृषिसंस्कृतीतला एक महत्त्वाचा सण आहे पोळा. सर्वांना सदिच्छा....
सुनील इंदुवामन ठाकरे
वणी, जि. यवतमाळ
8623053787




