विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी :येथील वणी पब्लिक स्कूल मध्ये दिनांक 10 सप्टेंबरला तान्हा पोळा सण मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृती व ग्रामीण परंपरांची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी तसेच आपल्या मातीत रुजलेल्या सणांचे महत्त्व समजावे,या उद्देशाने शाळेत विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी आकर्षक पद्धतीने सजवलेले लाकडी बैल शाळेत आणले.रंगीबेरंगी सजावट,फुलांच्या माळा, झुली,गोंडे आणि पारंपारिक दागिन्यांनी सजवलेल्या बैलजोळ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.चिमुकल्या विद्यार्थ्यांचा पारंपारिक वेशभूषेतील उत्साह आणि आनंद पाहण्यासारखा होता.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना शेतकरी आणि बैल यांचे नाते, शेतातील बैलांचे महत्त्व तसेच तान्हा पोळ्याची परंपरा याविषयी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सतीश बाविस्कर यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली तसेच शाळेच्या उपमुख्याध्यापक आश्लेषा जेणेकर यांनी आपली संस्कृती,परंपरा आणि ग्रामीण जीवनशैली याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.शाळेच्या शिक्षक वृंदाच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम उत्साह पूर्ण आणि आकर्षक वातावरणात पार पडला.


