ठळक बातम्या

    वणी पब्लिक स्कूल येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि शिक्षक दिन जल्लोषात साजरा

     

    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी :वणी येथील वणी पब्लिक स्कूल येथे दिनांक 5 सप्टेंबरला श्रीकृष्ण जन्माष्टमीआणि शिक्षक दिन उत्साह पूर्ण आणि आनंदमय वातावरणात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.

    या निमित्ताने संपूर्ण शाळेचे वातावरण भक्तिमय आणि उत्सवी रंगानी न्हाऊन निघाले. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण, राधा व गोपींच्या आकर्षक वेशभूषेत सहभागी होत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 

    बालकृष्णाच्या रूपातील विद्यार्थ्यांनी मटकी, बासरी आणि पारंपारिक वेशभूषेसह सुंदर सादरीकरण केले.कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे दहीहंडी फोडण्याचा रोमांचक सोहळा!विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत गोविंदाच्या

    जयघोषात दहीहंडी फोडली. "गोविंदा आला रे! "च्या गजराने संपूर्ण शाळेचा परिसर दुमदुमून गेला. याचबरोबर भारताचे माजी राष्ट्रपती व महान तत्वज्ञ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत

    शिक्षकांचे महत्त्व आणि त्यांच्या मार्गदर्शनाची भूमिका याविषयी मनोगते व्यक्त केली . कृष्णाच्या शिकवणुकीतील जीवनमूल्ये आणि गुरूंच्या मार्गदर्शनातून यशाची वाट हा सुंदर संदेश शाळेचे मुख्याध्यापक सतीश बाविस्कर यांनी विद्यार्थ्यांना दिला.

    शिक्षक दिनानिमित्त इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी एक अनोखा उपक्रम राबविला इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता पहिली ते नववी पर्यंतच्या वर्गांमध्ये शिक्षकांची भूमिका पार पाडत अध्यापन केले. विद्यार्थ्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने वर्ग घेतले धडे समजावून सांगितले आणि छोट्या छोट्या उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांची संवाद साधला.विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, आकर्षक वेशभूषा, दहीहंडीचा थरार आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी घेतलेले वर्ग यामुळे हा सोहळा अत्यंत आनंददायी व अविस्मरणीय ठरला



    Photo