राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वणीत १०१ वा विजयादशमी उत्सव उत्साहात
विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : “हिंदू समाज हा शक्तिसंपन्न असून, समाजातील सज्जनशक्ती संघटित होणे आवश्यक आहे. शक्तीसोबत चारित्र्य आणि संयमाची जोड असली पाहिजे. भारतमातेला परमवैभवाप्रत नेण्यासाठी शाखेच्या माध्यमातून व्यक्तिनिर्माणाचे कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करीत आहे,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सहशारीरिक प्रमुख पंजाबराव अव्हाडे यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०१ व्या वर्षानिमित्त वणी शहरातील एसपीएम विद्यालयाच्या प्रांगणात शनिवार, २४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून अव्हाडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रतीक कावडे होते. व्यासपीठावर तालुका संघचालक हरिहर भागवत आणि नगर संघचालक किरण बुजोने उपस्थित होते.
अव्हाडे म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने १०१ वर्षांच्या वाटचालीत ध्येयपूर्तीसाठी आवश्यक संघटनशक्ती निर्माण केली आहे. हिंदू जीवनपद्धतीत स्त्रीला शक्तीचे प्रतीक मानून मातेसमान स्थान दिले जाते. धर्माला आधार मानून जीवन जगण्याची परंपरा हिंदू संस्कृतीत आहे. हिंदुत्व हा आपल्या जीवनपद्धतीचा स्वभाव असून, या स्वत्वाचा विसर पडल्यास समाजाला परकीय गुलामगिरीचा सामना करावा लागला, असे त्यांनी नमूद केले.
भगवा ध्वज प्रेरणेचे प्रतीक असून, केवळ शारीरिक शक्ती नव्हे, तर बौद्धिक प्रगती आणि चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्त्वही महत्त्वाचे आहे. मन, मनगट आणि बुद्धी यांचा विकास झाल्याशिवाय राष्ट्राची उभारणी होऊ शकत नाही. राष्ट्रभक्तीची भावना समाजाच्या सर्व स्तरांत रुजविणे आणि राष्ट्र प्रथम हा विचार दृढ करणे आवश्यक आहे. संघाची खरी ताकद स्वयंसेवक असून, पंचपरिवर्तनाची सुरुवात प्रत्येक स्वयंसेवकाच्या घरातून झाली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
कुटुंबव्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित करताना अव्हाडे यांनी भारतीय समाजाच्या एकात्मतेत कुटुंबसंस्थेची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. समाजात स्वत्वाचा बोध, राष्ट्रनिष्ठा आणि सांस्कृतिक मूल्यांची जपणूक होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
• समाजाचे स्वास्थ्यही शरीराइतकेच महत्त्वाचे
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रतीक कावडे यांनी विजयादशमी हा सत्याचा असत्यावरील विजय दर्शविणारा आणि नैतिकतेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देणारा सण असल्याचे सांगितले. मानवी शरीरात २०६ हाडे असतात. शरीरातील एखादा सांधा कमकुवत झाल्यास शारीरिक स्वास्थ्य बिघडते. त्याचप्रमाणे समाजजीवनातील परस्पर सामंजस्याचे सांधे कमकुवत झाल्यास समाजाचे स्वास्थ्यही बिघडते, असे ते म्हणाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती आणि नैतिक मूल्यांची रुजवण करून त्यांना राष्ट्रउभारणीसाठी प्रेरित करतो. शरीराचे आरोग्य जपण्याइतकेच समाजाचे स्वास्थ्य टिकविणे महत्त्वाचे असून, त्यासाठी राष्ट्राप्रती समर्पित भावनेने कार्य करण्याची गरज असल्याचे डॉ. कावडे यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. त्यानंतर अतिथींच्या समोर युद्ध कौशल्याचे प्रात्यक्षिक व सामूहिक कवायत घेण्यात आली. नगर संघचालक किरण बुजोने यांनी प्रास्ताविक केले. श्रेयश धगडी यांनी सुभाषित सादर केले, तर आदित्य पांडे यांनी अमृतवचन सांगितले. प्रवीण सातपुते यांनी वैयक्तिक गीत सादर केले, तर सांघिक गीत कृष्णकुमार पानेरी यांनी घेतले. प्रसाद चिडले यांनी उत्सवाचे मुख्य शिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली. स्वयंसेवक आणि नागरिकांच्या उपस्थितीत विजयादशमी उत्सव संपन्न झाला.



