विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी :गुप्तधनाच्या शोधासाठी अंधश्रद्धेतून मानकी गावालगतच्या खेकडी (रिठ) हनुमान मंदिर परिसरात खड्डा खोदल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री उघडकीस आला. यावेळी ग्रामस्थांनी दोघांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले, तर अन्य पाच जण अंधाराचा फायदा घेत पसार झाले. या प्रकरणी वणी पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सुमारे आठ वाजता पाच पुरुष आणि दोन महिला मंदिराजवळ पूजा-पाठ करून टिकास व फावड्याच्या साहाय्याने खड्डा खोदत असल्याचे काही युवकांच्या निदर्शनास आले. त्यांनी ग्रामस्थांना माहिती दिल्यानंतर सुमारे १०० ते १५० ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. ग्रामस्थांना पाहताच पाच जणांनी पळ काढला. मात्र, वणीतील अनिल मारोती बावणे (५६) आणि मानकी येथील रामदास निळकंठ दर्वे (४४) यांना ग्रामस्थांनी पकडले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस पाटील आणि तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांनी वणी पोलिसांना कळविले. सहायक पोलीस निरीक्षक सय्यद साजिद यांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून दोघांना ताब्यात घेतले. घटनास्थळावरून पूजेसाठी वापरण्यात आलेले साहित्य, पाच लाडू, पाच चिकन सुपाऱ्या तसेच टिकास व फावडे जप्त करण्यात आले.
या प्रकरणात विठ्ठल अतकरे (३०), गणेश नागपुरे (२८), वासुदेव (पूर्ण नाव माहीत नाही, वय अंदाजे ५०, तिघेही रा. घुग्घुस), रंजना कामटकर (३५, रा. मैल गड्डा, शास्त्रीनगर, वणी) आणि अंदाजे ३५ वर्षांची एक अनोळखी महिला हे पाच जण फरार असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
आरोपींविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ चे कलम ३, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सय्यद साजिद व त्यांच्या पथकाने केली.
