पोलीस प्रशासन, शांतता समिती, नगरपरिषद व रोटरी क्लबच्या नियोजनाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : वणी शहरात २१ व २२ ऑक्टोबर २०२६ रोजी नवरात्रोत्सवाची सांगता करणारा श्री दुर्गामातेचा विसर्जन सोहळा हर्षोल्हास, शिस्त आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. विशेष म्हणजे यंदाचा विसर्जन सोहळा DJ मुक्त ठेवत ध्वनीप्रदूषणाला बगल देत शांततेत पार पडल्याने पोलीस प्रशासनाच्या या सकारात्मक भूमिकेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
विसर्जन मिरवणुकीदरम्यान शहरातील विविध महिला दुर्गा उत्सव मंडळांचा उत्साह वाढविण्यासाठी शांतता समिती, वणीच्या वतीने महिला मंडळांचा हार घालून सन्मान करण्यात आला. या उपक्रमामुळे महिला मंडळांच्या उत्साहात आणखी भर पडली.
दरम्यान, दुष्काळी परिस्थिती आणि नदीतील कमी पाणीसाठ्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन वणी नगरपरिषद प्रशासनाने नदीकाठी विसर्जनासाठी आवश्यक व्यवस्था उपलब्ध करून दिली. भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि श्री अंबामातेचा विसर्जन सोहळा सुरळीत पार पडावा, यासाठी प्रशासनाने केलेल्या नियोजनामुळे विसर्जन प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पडली.
पोलीस प्रशासनाची शिस्तबद्ध सुरक्षा व्यवस्था, शांतता समितीचा सामाजिक सहभाग, नगरपरिषद प्रशासनाचे नियोजन आणि रोटरी क्लबची सेवाभावी भूमिका यामुळे वणीतील दुर्गामातेचा विसर्जन सोहळा शांतता, संयम आणि भक्तीचा आदर्श निर्माण करणारा ठरला.






