ठळक बातम्या

    डॉ. महेंद्र लोढा यांचा वणी शहर काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा नगरपालिकेतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा

     


    विदर्भ वार्ता|प्रतिनिधी

    वणी : वणी नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर वणी शहर काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. महेंद्र लोढा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे राजीनामा पत्रात नमूद केले आहे. त्यांनी राजीनामा पत्र जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मानकर यांना पाठवले आहे.

    डॉ. लोढा यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने वणी शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवून त्यांच्यावर जो विश्वास दाखवला, त्याबद्दल ते मनापासून कृतज्ञ आहेत. शहर अध्यक्ष म्हणून निवडणूक तयारी, संघटन आणि कार्यकर्त्यांचे समन्वय साधण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. पक्षाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले, मात्र तरीही निवडणुकीत अपेक्षित निकाल साधता आला नाही. या अपयशाची संपूर्ण नैतिक जबाबदारी स्वीकारत ते शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा सादर करीत आहे.

    सध्या वैद्यकीय क्षेत्रातील वाढत्या व्यावसायिक जबाबदाऱ्यांमुळे रुग्णसेवा व वैद्यकीय कामाला अधिक वेळ देणे आवश्यक असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे पक्षाच्या कामाला अपेक्षित वेळ देणे शक्य होणार नाही. त्यामुळे आजपासून या पदापासून मुक्त होत आहे, असे त्यांनी राजीनामा पत्रात स्पष्ट केले आहे. आता काँग्रेसचे वणी शहराध्यक्ष पदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    *सामाजिक कार्य ठरले लक्षवेधी*

    डॉ. महेंद्र लोढा हे गेल्या अनेक वर्षांपासून वणी शहरात वैद्यकीय सेवा क्षेत्रात कार्यरत आहेत. गेल्या 10 ते 12 वर्षांपासून ते राजकारणात सक्रिय आहेत. सामाजिक कार्याचा त्यांचा मोठा धडाका होता. रस्ते बांधणी, बोअरवेल, पूल बांधणी, आरोग्य सेवा असे अनेक सामाजिक कामं त्यांनी लोकसहभागातून ग्रामीण भागात केलीत. तेजापूर येथील पूल बांधण्याच्या त्यांच्या उपक्रमाची राज्यभरात चर्चा झाली होती. लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही त्यांनी पक्षाचे काम चोखपणे बजावले. नगरपालिका निवडणुकीतही ते विविध सभा, रॅली, पदयात्रेत सहभाग घेत पक्षाचे प्रामाणिकपणे काम करीत होते.

    Photo