विदर्भ वार्ता|प्रतिनिधी
वणी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला संविधान दिले आणि त्याच संविधानाच्या आधारे देशाचा राज्यकारभार, नागरिकांचे अधिकार व कर्तव्ये निश्चित झाली. दरवर्षी २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. मात्र याच दिवशी संविधानाचे शिल्पकार असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सन्मान न दिल्याने सिंदोला येथील अडानी माऊंट कार्मेल माईन्स प्रशासनावर गावकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
दि. २६/०१/२०२६ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बाबासाहेबांची प्रतिमा का ठेवण्यात आली नाही, असा थेट प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला. “ज्या महापुरुषांनी देशाला संविधान अर्पण केले, त्यांच्या विचारांवरच आज देश उभा आहे. अशा व्यक्तिमत्त्वाच्या प्रतिमेचा अभाव हा केवळ दुर्लक्ष नव्हे, तर सामाजिक संवेदनशीलतेचा अभाव दर्शवतो,” अशी प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.
या घटनेमुळे परिसरात चर्चा रंगली असून, पुढील शासकीय व सार्वजनिक कार्यक्रमांत संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सन्मानपूर्वक स्थान देण्यात यावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन भविष्यात अशी चूक होणार नाही, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

