विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : शिरपूर–चारगाव–वणी एरियातील मुंगोली–कोलगाव येथील खाणीमधून सुरू असलेल्या कोळसा वाहतुकीदरम्यान उडणाऱ्या कोळसा धुळीमुळे रस्त्यालगतच्या शेतांतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे शेतकरी अडचणीत सापडले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई मिळावी, या मागणीसाठी मा. विजय पिदुरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य वणी यांच्या नेतृत्वाखाली आबई फाटा येथे आंदोलन करण्यात आले होते.
या आंदोलनाची दखल घेत दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतपिकांची पाहणी केली. ग्राम महसूल अधिकारी श्री. पत्रे, कृषी सहाय्यक श्री. घुगे, विराट वेकोलीचे कर्मचारी श्री. हेमंत पांडे, तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. हेमंत गौरकर यांच्या उपस्थितीत नुकसानग्रस्त कापूस उत्पादक शेतकरी श्री. येरगुडे यांच्या शेतात जाऊन पिकांचे नुकसान तपासण्यात आले.
पाहणीदरम्यान कोळसा धुळीमुळे कापूस व इतर पिकांवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे स्पष्ट झाले. नुकसान अहवाल तयार करून शासनाकडे सादर करण्यात येणार असून, लवकरात लवकर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी, अशी मागणी न आवश्यक उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली आहे.



