विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : " भारताच्या जवळ जगात सगळ्यात मोठ्या संख्येत असणारी तब्बल ३७ कोटी पेक्षा अधिक युवकांची संख्या भारताची खरी संपत्ती असून या युवकांना कौशल्य संपन्न तरुणाई मध्ये परिवर्तित करण्याचे कार्य हे महाविद्यालयाचे उद्दिष्ट असायला हवे. महाविद्यालयातील संचालक मंडळा पासून विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्येकाने यादृष्टीने विचार आणि कृती करायला हवी" असे मत मोहता सायन्स महाविद्यालय नागपूरचे प्राचार्य डॉ. जीवन दोंतुलवार यांनी व्यक्त केले.
शिक्षण प्रसारक मंडळ वणी संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभागाद्वारे आयोजित युवा भरारी या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी, " राष्ट्र निर्मितीमध्ये युवकांचा सहभाग" या विषयावर ते व्यक्त होत होते. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी संस्थेचे सहसचिव अशोक सोनटक्के तथा संचालक उमापती कुचनकर, प्राचार्य डॉ प्रसाद खानझोडे, होता महाविद्यालयाचे उपप्राचार्य संदीप तम्मेवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
नटराज, शिवछत्रपती आणि लोकमान्य यांच्या प्रतिमापूजनानंतर महाराष्ट्र गीताने तथा स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
शिवछत्रपती जयंतीच्या निमित्ताने महाविद्यालयातील शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून विद्यार्थी विकास विभागाच्या विद्यार्थ्यांनी शिवगर्जना सादर केली.
प्रास्ताविकामध्ये विद्यार्थी विकास विभागाचे संयोजक डॉ अभिजित अणे यांनी उपक्रमाची भूमिका, विद्यार्थ्यांसाठी आयोजित विविध स्पर्धाची माहिती आणि विद्यापीठ स्तरीय सहभागावर प्रकाश टाकला.
प्राचार्य प्रसाद खानझोडे यांनी ३४ क्रीडा प्रकारांमध्ये सुमारे एक हजार विद्यार्थ्यांच्या आणि युवा भरारी च्या २३ विभागांमध्ये साडेसहाशे विद्यार्थ्यांच्या सहभागाबद्दल समाधान व्यक्त करीत वक्त्यांचा परिचय करून दिला.
राष्ट्राने माझ्यासाठी काय केले या विचारापेक्षा मी राष्ट्रासाठी काय करू शकतो याचा विचार करीत साधे महाविद्यालयात सुरू असलेली विजेच्या उपकरणाचे बटन बंद करणे देखील राष्ट्रप्रेम आहे असे म्हणत डॉ. दोंतुलवार यांनी विविध विषयांवर विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये आकाशी झेप घे रे पाखरा ! या गाण्यांच्या आधारे मन, मेंदू आणि मनगट यांच्या समतोल विकासाचे महत्व अशोक सोनटक्के यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विकास जुनगरी यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. किसन घोगरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयंत त्रिवेदी, संजय बिलोरिया, पंकज सोनटक्के, नितीन चामाटे यांनी विशेष परिश्रम घेतले.

