ठळक बातम्या

    येनक गावात स्मार्ट मीटरविरोधात ग्राहकांचा रोष; अव्वाच्या सव्वा वीजबिलांमुळे साधे मीटर बसवण्याची मागणी

     


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी : तालुक्यातील येनक गावातील विद्युत ग्राहकांनी स्मार्ट मीटरमुळे अवाजवी वीजबिले येत असल्याचा आरोप करत महावितरण उपशाखा शिरपूरकडे तक्रार अर्ज सादर केला आहे. रणजीत एकनाथ बोंडे, प्रभूदास दरेकर, अरविंद येडे, राजू डाखरे, नथ्थु पंडीले यांच्यासह अनेक ग्राहकांनी स्मार्ट मीटर काढून पुन्हा साधे मीटर बसवण्यात यावेत, अशी ठाम मागणी केली आहे.

    ग्रामीण भागातील काही ग्राहकांचे जुने मीटर बंद अवस्थेत असल्याने महावितरणने नवीन स्मार्ट मीटर बसवले होते. सुरुवातीचे एक ते दोन महिने मीटर व्यवस्थित चालले; मात्र सध्या हिवाळ्याच्या दिवसातसुद्धा मीटर अतिशय वेगाने फिरत असून अपेक्षेपेक्षा कित्येक पटीने जास्त वीजबिले येत असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे.

    येनक गावातील बहुसंख्य नागरिक शेतकरी असून त्यांचा वीज वापर अत्यल्प आहे. घरात फारशी विद्युत उपकरणे नसतानाही अव्वाच्या सव्वा बिले येत असल्याने ग्राहक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे जोपर्यंत स्मार्ट मीटर काढून साधे मीटर बसवले जात नाहीत, तोपर्यंत वीजबिल भरणार नसल्याची भूमिका ग्राहकांनी घेतली आहे.

    स्मार्ट मीटरबाबत तात्काळ योग्य निर्णय न झाल्यास भविष्यात उद्भवणाऱ्या परिणामास महावितरण उपशाखा शिरपूर जबाबदार राहील, असा इशाराही अर्जात देण्यात आला आहे. या प्रकरणाकडे महावितरण प्रशासन काय भूमिका घेते, याकडे येनक गावासह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.



    Photo