ठळक बातम्या

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच वणी तर्फे माता रमाईंची १२८ वी जयंती उत्साहात साजरी

     


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी : दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच, वणी यांच्या वतीने माता रमाई आंबेडकर यांची १२८ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मंचाचे पदाधिकारी बंडू कांबळे, संजय तेलंग, घनश्याम ठमके, पुरुषोत्तम पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास तसेच माता रमाई यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर त्रिशरण पंचशील घेण्यात आले.

    कार्यक्रमाला मंचाचे इतर पदाधिकारी व नगरसेविका करूना कांबळे यांनीही हार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्रा. पुरुषोत्तम पाटील यांनी माता रमाई यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना त्यांच्या संघर्षमय जीवनाचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, रमाई यांच्या जीवनात संकटांची मालिका सतत पाठीशी लागलेली होती.

    रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील दाभोळजवळील वनद गावात १८९८ साली माता रमाई यांचा जन्म झाला. वडील बंदरावर मासे विकण्याचे काम करीत तर आई शेण गोळा करून गोवऱ्या बनवून विकत असत. रमाई लहानपणापासूनच आई-वडिलांच्या कष्टात हातभार लावत होत्या. कष्टामुळे आई-वडिलांचे एकामागोमाग निधन झाले. त्यानंतर रमाई आपल्या काका वलंगकर (धुत्रे), मामा गोविंद पुरकर, लहान बहीण गौरी व भाऊ शंकर यांच्यासह मुंबईच्या भायखळा येथे आल्या.

    वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी त्यांचा विवाह भीमराव आंबेडकरांशी (वय १२ वर्षे) झाला. विवाहानंतरही दुःख व संघर्षांची मालिका संपली नाही. रमाई यांना केवळ ३७ वर्षांचे आयुष्य लाभले. २७ मे १९३५ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली, असे प्रा. पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

    कार्यक्रमाचे संचालन बंडू कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन घनश्याम ठमके यांनी केले. कार्यक्रमाला संजय तेलंग, रामदास कांबळे, पुंजाराम भादीकर, वसंत नगराळे, विजय नगराळे, कवडू जिवने, पुंडलिक पथाडे, अशोक पडवेकर, गंगाधर रामटेके, विवेक तेलंग, नगरसेविका करूना कांबळे, रवी कांबळे, दादाजी घडले यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.




    Photo