विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस म्हणजे गुढी पाडवा—मराठी नववर्षाची सुरुवात.(मांडवस) या सणाला शेतकरी बांधवांसाठी विशेष महत्त्व आहे. वर्षभराच्या कष्टानंतर नव्या हंगामाच्या स्वागतासाठी आणि सुख-समृद्धीच्या कामनेसाठी गुढी पाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी घराघरांत गुढी उभारली जाते, तर शेतकरी बांधवांमध्ये पारंपरिक “घुगरी” बनवण्याची आणि ती एकत्र बसून ग्रहण करण्याची प्रथा आजही मांडवशी ला जपली जात आहे.
घुगरी ही हरभरा, चणे किंवा इतर कडधान्यांपासून तयार केली जाणारी एक साधी पण पौष्टिक खाद्यपदार्थ आहे. शेतात पिकलेल्या धान्याचे प्रतीक म्हणून घुगरीला विशेष स्थान आहे. सकाळी गुढी उभारल्यानंतर कुटुंबीय एकत्र येऊन घुगरीचा नैवेद्य दाखवतात आणि नंतर आनंदाने ती खातात. या माध्यमातून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.
ग्रामीण भागात तर गुढी पाडवा (मांडवस) हा केवळ सण नसून सामाजिक एकोप्याचे प्रतीक आहे. शेतकरी बांधव शेजारी, मित्र आणि नातेवाईकांसोबत घुगरी वाटून खातात, ज्यामुळे आपुलकी आणि एकजूट वाढते. अनेक ठिकाणी सामूहिक घुगरीचे कार्यक्रम आयोजित करून सण अधिक रंगतदार केला जातो.






