ठळक बातम्या

    गोकुळनगरमध्ये गोमांस प्रकरणी दुहेरी कारवाई; १.५ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त, तिघांवर गुन्हे

     


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी : शहरातील गोकुळनगर परिसरात शुक्रवारी (दि. १० एप्रिल) सकाळी पोलिसांनी गोमांस तस्करी व अवैध विक्रीविरोधात सलग दोन धडक कारवाया करत मोठा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत तिघा आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी सकाळपासूनच कडक मोहीम राबविल्याचे दिसून आले.

    पहिल्या कारवाईत सकाळी साडेसातच्या सुमारास पोलिसांनी गोकुळनगर येथे छापा टाकून सलमान शकिल शेख (२५) व नावेद शेख रियाज (२२), दोघेही रा. खडबडा मोहल्ला, यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून सुमारे ९० किलो ५०० ग्रॅम गोमांस (अंदाजे किंमत ₹१८,१००) जप्त करण्यात आले. हे मांस अवैधरित्या विक्रीसाठी साठवून ठेवले असल्याचे फिर्यादी विशाल पांडुरंग दुधबळे यांच्या जबानीवरून स्पष्ट झाले. या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमातील कलम ५, ५(सी), ९, ९(अ) तसेच BNS कलम ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलीस हवालदार मारोती पाटील करत आहेत.

    यानंतर सकाळी ९ वाजताच्या सुमारास त्याच परिसरात दुसरी कारवाई करण्यात आली. या वेळी आरोपी अब्दूल माजिद अब्दूल सत्तार (३५), रा. मोमिनपुरा याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून ३९ किलो गोमांस (₹७,८००) तसेच विना नंबरची ज्यूपीटर मोपेड (₹२०,०००) असा एकूण ₹२७,८०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर आरोपी हा मोपेडवरून गोमांस विक्रीसाठी नेत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस कर्मचारी गजानन सावसाकडे करीत आहेत.

    दोन्ही कारवायांमध्ये फिर्यादी विशाल पांडुरंग दुधबळे (रा. पटवारी कॉलनी, वणी) यांच्या तक्रारीवरून गुन्हे नोंदविण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे. गोकुळनगर परिसरात झालेल्या या दुहेरी कारवाईमुळे अवैध गोमांस विक्रीविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.



    Photo