ठळक बातम्या

    जनतेच्या न्यायहक्कासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे निष्कलंक नेतृत्व; मा. ॲड. वामनराव चटप साहेबांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    राजुरा : संघर्ष, प्रामाणिकपणा आणि जनसेवा यांचे जिवंत प्रतीक असलेले विदर्भ राज्य आंदोलन समितीचे संस्थापक अध्यक्ष, शेतकरी नेते, राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा उत्कृष्ट संसदपटू मा. ॲड. वामनराव चटप साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विदर्भाच्या न्यायहक्कासाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी तब्बल ४५ वर्षांहून अधिक काळ सातत्याने संघर्ष करणाऱ्या या निष्कलंक नेतृत्वाला नागरिकांनी अभिवादन केले आहे.

    सत्ता, संपत्ती आणि स्वार्थाच्या राजकारणापेक्षा जनतेचा विश्वास आणि समाजाचा विकास अधिक महत्त्वाचा मानणारे व्यक्तिमत्त्व म्हणून मा. ॲड. वामनराव चटप साहेब यांची ओळख आहे. त्यांनी आपल्या वकिली ज्ञानाचा उपयोग केवळ न्यायालयापुरता मर्यादित न ठेवता शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित समाजाच्या न्यायासाठी केला. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी आणि ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला आहे.

    राजुरा विधानसभा क्षेत्राचे तीन वेळा आमदार म्हणून जनतेने त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला. १९९० ते १९९५, १९९५ ते १९९९ आणि २००४ ते २००९ या कार्यकाळात त्यांनी राजुरा, गोंडपिंपरी, कोरपना आणि जिवती तालुक्यात ऐतिहासिक विकासकामे राबविली. राजुरा शहरात बसस्थानक, न्यायालयाची इमारत, भूमी अभिलेख कार्यालय, मुख्य पोलीस स्टेशन, उपविभागीय कार्यालय, आयटीआय इमारत तसेच वर्धा नदीवरील पुलासाठी निधी मंजूर करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. गावोगावी पांदण रस्ते, विहिरी, पाणीपुरवठा, आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.

    गोंडपिंपरी तालुक्यात आयटीआय, वस्तीगृहे, बसस्थानक आणि न्यायालयाच्या इमारती उभारण्यात आल्या. कोरपना तालुक्याची निर्मिती करून विविध शासकीय कार्यालयांच्या इमारती बांधण्यात आल्या. ग्रामीण रुग्णालये, तहसील कार्यालय, बालविकास कार्यालय तसेच विद्युतीकरण नसलेल्या गावांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले. तत्कालीन राज्यपाल एस. एम. कृष्णा यांनी कोरपना तालुका दत्तक घेतल्यामुळे विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला.

    अतिदुर्गम जिवती तालुक्याच्या विकासासाठीही मा. चटप साहेबांनी विशेष प्रयत्न केले. जिवती येथे आयटीआय, तहसील कार्यालय, वस्तीगृहे आणि पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली. माणिकगड परिसरातील महसुली नोंदीत नसलेल्या अनेक गुड्यांचा शोध घेऊन तेथील कोलाम बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले. अनेक कुटुंबांना घरे उपलब्ध करून देत पाणी, आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा पोहोचविण्याचा ध्यास त्यांनी घेतला.

    मा. ॲड. वामनराव चटप साहेब हे केवळ राजकारणी नसून संघर्ष, प्रामाणिकपणा आणि विदर्भाच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. त्यांच्या कार्यामुळे अनेक युवकांना प्रेरणा मिळाली असून सर्वसामान्य जनतेला न्यायासाठी लढण्याची ताकद मिळाली आहे. वयाची ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही जनतेच्या न्यायहक्कासाठी ते तितक्याच ताकदीने संघर्ष करत आहेत. त्यांच्या चारित्र्यावर आजपर्यंत कोणताही डाग नसल्याने ते निष्कलंक नेतृत्व म्हणून ओळखले जातात.

    माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील मुलाच्या घरी येऊन त्यांनी सन्मान केला, आशीर्वाद दिले आणि स्वतः हस्ताक्षरात पत्र लिहून शुभेच्छा दिल्या. हे माझ्यासाठी आयुष्यातील मोठे भाग्य आहे,” अशा भावना विशाल एम. शेंडे, राजुरा (वरूर रोड) यांनी व्यक्त केल्या.

    जनतेच्या हक्कासाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाला निरोगी, दीर्घायुष्य लाभो, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

    माजी आमदार मा.श्नी, ॲड चटप साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.... विदर्भ वार्ता /पत्र पोर्टल न्यूज वणी कडून.





    Photo