ठळक बातम्या

    उकनी कोळसाखाणीत भीषण दुर्घटना; आमदार संजय देरकरांचा वेकोलि प्रशासनावर संताप

    “कामगारांच्या जीवाशी खेळ सहन करणार नाही” — घटनास्थळी अधिकाऱ्यांची कानउघाडणी

    विदर्भवार्त। प्रतिनिधी 

    वणी : वेकोलि वणी नॉर्थ क्षेत्रांतर्गत येणाऱ्या उकनी कोळसाखाणीत शुक्रवारी घडलेल्या भीषण दुर्घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. भूगर्भातील उत्खनन सुरू असताना साचलेल्या गाळयुक्त पाण्याला रोखून धरणारा मातीचा शिल्ड अचानक फुटल्याने चिखल, गाळ आणि पाण्याचा प्रचंड लोंढा उत्खनन क्षेत्रात घुसला. या भीषण प्रवाहात दोन महाकाय डंपर चिखलात गाडले गेले. सुदैवाने चालकांनी प्रसंगावधान राखत वेळेत बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली.

    घटनेची माहिती मिळताच वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. दुर्घटनास्थळावरील भयावह स्थिती पाहून त्यांनी वेकोलि प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त करत सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

    “कामगार रोज जीव धोक्यात घालून काम करतात आणि प्रशासन सुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्ष करते, हे अत्यंत गंभीर आहे. आज सुदैवाने जीवितहानी टळली; मात्र भविष्यात अशी घटना घडली तर त्याची जबाबदारी कोण घेणार?” असा थेट सवाल आमदार देरकर यांनी अधिकाऱ्यांना केला.

    प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, काही क्षणांतच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. शिल्ड फुटल्यानंतर आलेल्या गाळयुक्त पाण्याच्या लोंढ्यामुळे संपूर्ण परिसर हादरला. एका डंपरचा चालक वाहनात अडकला होता; मात्र प्रसंगावधान राखत तो कसाबसा बाहेर पडल्याने त्याचा जीव वाचला.

    आमदार देरकर यांनी घटनास्थळीच उपक्षेत्रीय प्रबंधक स्वामी व इतर अधिकाऱ्यांना सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. खाण क्षेत्रातील सर्व सुरक्षा व्यवस्थेची तातडीने तपासणी करून संभाव्य धोकादायक भागांचा आढावा घ्यावा आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशा कडक सूचनाही त्यांनी दिल्या.

    घटनास्थळी आमदार देरकर यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे वेकोलि अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. कामगारांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर त्यांनी घेतलेली ठाम भूमिका उपस्थित कामगार आणि ग्रामस्थांमध्ये चर्चेचा विषय ठरली.

    यावेळी शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख संजय निखाडे, टिकाराम खाडे, संजय देठे, गुलाब आवारी, जगण जुनगरी, विनोद ढुमणे, अजय धोबे, शंकर देरकर यांच्यासह शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



    Photo