ठळक बातम्या

    दहा वर्षांनंतर वणी–शिरपूर बससेवा सुरू; मोहदा येथे उत्साहात स्वागत समारंभ

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी,मोहदा : नागपंचमीच्या शुभप्रभाती वणी–शिरपूर–वेडाबाई–मोहदा–नेरड–पूरड या मार्गावरील बससेवा पुन्हा सुरू झाल्याने परिसरातील नागरिक, विद्यार्थी व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील  दहा वर्षांपासून बंद असलेली बससेवा सुरू होण्यासाठी श्री विजय भाऊ पिदुरकर यांच्या पुढाकारासह सौ. वर्षा राजुरकर, सरपंच मोहदा आणि श्री. सचिन रासेकर, उपसरपंच मोहदा यांच्या सातत्यपूर्ण मागणी व पाठपुराव्याला यश आले.

    या बससेवेचा स्वागत समारंभ मोहदा बसस्थानक येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी ग्रामस्थ, विद्यार्थी, नालंदा विद्यालय वेडाबाई येथील शिक्षक, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    बससेवा सुरू झाल्याबद्दल श्री. विजय पिदुरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य, तसेच बसचे चालक चंदू मेश्राम आणि वाहक सचिन भगत यांचा ग्रामस्थ, विद्यार्थी, सरपंच सौ. वर्षा राजुरकर व उपसरपंच श्री. सचिन रासेकर यांच्या उपस्थितीत शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

    दहा वर्षांपासून बंद असलेली बस पुन्हा सुरू झाल्यामुळे विशेषतः शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठी सोय झाली आहे. तसेच मोहदा, वेडाबाई, नेरड, पूरड व परिसरातील नागरिकांना दैनंदिन प्रवास, शिक्षण, रोजगार, बाजारपेठ तसेच शासकीय कामांसाठी ये-जा करणे सुलभ होणार आहे.

    “सातत्यपूर्ण मागणी, पाठपुरावा आणि लोकहिताची भूमिका यामुळे अखेर दहा वर्षांनंतर बससेवा सुरू झाली,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. बससेवा नियमितपणे सुरू राहावी, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली.

    या बससेवेमुळे परिसरातील विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून आला. नागपंचमीच्या दिवशी मिळाली ही बससेवेची भेट .

    Photo