विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : वणी तालुक्यातील नांदेपेरा आणि बेसा येथे विषारी औषध प्राशन केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन इसमांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली असून, दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधित यंत्रणेकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.
नांदेपेरा येथील घटना : नांदेपेरा येथील रहिवासी रविंद्र चरणदास शिरपुरकर (वय अंदाजे ४०) यांनी १३ ऑगस्ट रोजी रात्री ८ ते ९ वाजताच्या सुमारास हनुमान मंदिराजवळ विषारी औषध प्राशन केले. त्यांना तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालय, वणी येथे दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
रविंद्र शिरपुरकर यांच्या पश्चात पत्नी दुर्गा रविंद्र शिरपुरकर (३५), मुलगा रुद्र (५) आणि मुलगी सिद्धी (३) असा परिवार आहे.
बेसा येथील घटना : दुसरी घटना बेसा येथे घडली. येथील रहिवासी मोहन सदाशिव पोटे (वय अंदाजे ५०) यांनी १५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना प्रथम वणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रात्री सुमारे १० वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मोहन पोटे यांच्या नावावर ०.९९ हेक्टर शेतजमीन असल्याची माहिती आहे. त्यांच्या पश्चात पत्नी विठाबाई मोहन पोटे (४५) आणि मुलगा रूपेश (२६) असा परिवार आहे.
दोन्ही घटनांमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, संबंधित यंत्रणेकडून पुढील तपास व कार्यवाही सुरू आहे.
