विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : "व्यवहारात अनेक लोकांना विज्ञान त्यातही प्रामुख्याने बहुतेक शास्त्र आणि अध्यात्म शास्त्र या दोन पूर्ण वेगवेगळ्या गोष्टी वाटतात मात्र वास्तविकता अशी नाही. मानवी जीवन हे एकात्मस्वरूपाचे जीवन आहे त्यामुळे अध्यात्म असो की भौतिकशास्त्र या दोन्हींच्या माध्यमातून व्यक्तीच्या अंतिम आनंदाचे ध्येय समान असल्याने यांच्यातील भेद हा केवळ मार्गाचा भेद आहे. उद्दिष्टाचा ध्येयाचा भेद नाही. या वेगवेगळ्या पायवाटा एकाच बिंदूवर केंद्रित होणार आहेत. या दृष्टीने पाहिले तर त्यामध्ये अंतर्गत विरोध न दिसता त्यांची सुसंगती लक्षात येऊन आपले जीवन अधिक आनंददायी होऊ शकते" असे विचार सुप्रिया केदार मेहता यांनी व्यक्त केले.
विदर्भ साहित्य संघ शाखा वणी आणि मुसाबाई चोपणे उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माझ गाव माझा वक्ता या वैशिष्ट्यपूर्ण व्याख्यानमालेच्या ६२ व्या पुष्पात भौतिकशास्त्र आणि अध्यात्म या विषयावर त्या व्यक्त होत होत्या.
याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघ शाखा वणीचे अध्यक्ष डॉ. अभिजित अणे तथा प्रमुख अतिथी स्वरूपात विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र देवाळकर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन ताजणे सरांनी केले. विसासंघाचे सदस्य अरुण कावडकर यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला.
आपल्या संयत आणि अभ्यासपूर्ण निरूपणामध्ये सुप्रिया केदार मेहता यांनी वेदातील हिरण्यगर्भ सूक्त आणि भौतिकशास्त्राने मांडलेली बिग बँक थेअरी, नासदीय सूक्त आणि आदिम विश्व निर्मिती सिद्धांत यांच्यातील साम्य उलगडून दाखविले. श्रीमद् भगवद्गीतेतील नैनंछिंदन्ति हा श्लोक म्हणजे थर्मोडायनामिक चा प्रथम सिद्धांत कसा आहे ? याचे देखील त्यांनी स्पष्टीकरण केले. त्यासोबतच अध्यात्मातील कर्मफल सिद्धांत आणि भौतिक शास्त्रातील ॲक्शन आणि रिएक्शन चा नियम यातील साम्य देखील स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या सुयोग्य संचालनासाठी आणि वक्त्यांच्या अभ्यासपूर्ण निवेदनासाठी रवींद्र देवळकर यांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अभिजित अणे यांनी अल्फा बीटा पेक्षाही सूक्ष्म स्वरूपात शोधलेल्या मूळ कणाला विज्ञानाने देवकण म्हटल्याचा उल्लेख करीत, या दोन्ही शास्त्राच्या सुंदर समन्वयाबद्दल केदार यांचे आणि आयोजनाबद्दल नुसाबाई चोपणे विद्यालयाचे कौतुक केले.
गावातील मान्यवरांसह शालेय विद्यार्थ्यांनी या आयोजनाचा आस्वाद घेतला. विसा संघाचे सचिव राजेश महाकुलकर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.


